आदर्श घोटाळ्यामुळे रोखला होता ‘अय्यारी’

सामना ऑनलाईन । मुंबई

सिद्धार्थ मल्होत्रा आणि मनोज बाजपेयी यांचा आगामी चित्रपट अय्यारीत महाराष्ट्राला हादरविणाऱ्या आदर्श घोटाळ्यावर भाष्य करण्यात आल्याचे समोर आले आहे. आदर्श घोटाळ्यावर भाष्य केलेले असल्यामुळेच या चित्रपटाच्या प्रदर्शनावर रोख लावण्यात आली होती. मात्र आता या चित्रपटाला संरक्षण मंत्रालयाने हिरवा कंदिल दाखविला आहे. दरम्यान या चित्रपटातील आदर्श घोटाळ्याचा उल्लेख ठेवलाय की संरक्षण मंत्रालयाने त्याला कात्री लावली आहे हे अद्याप समजलेले नाही.

दिग्दर्शक नीरज पांडे यांच्या अय्यारी चित्रपटात आदर्श घोटाळ्याचा उल्लेख असल्याने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर सुरूवातीला रोख लावण्यात आली होती. या चित्रपटात त्यांनी थेट ‘आदर्श घोटाळा’ असा उल्लेख टाळला असून यात “कुलाबा प्लॉट’ असा उल्लेख करण्यात आला आहे. या कुलाबा प्लॉटवरची इमारतदेखील आदर्श सारखीच शहीद जवानांच्या वीरपत्नींसाठीच बांधलेली असल्याचे दाखविण्यात आले आहे. तसेच या इमारतीबद्दल नसरुद्दीन शाह यांचा एक डायलॉ़ग देखील आहे ज्यात ते म्हणतात, “की ये सब खा जायेंगे नेता और नेता के चमचे”

निरज पांडे दिग्दर्शित अय्यारी हा चित्रपट जवानांच्या आयुष्यावर आहे. यात सिद्धार्थ मल्होत्रा आणि मनोज बाजपेयी हे जवानांच्या भूमिकेत दिसणार आहेत. आधी हा चित्रपट ९ फेब्रुवारीला प्रदर्शित केला होता मात्र सेन्सॉर बोर्डाने याला नाहरकत प्रमाणपत्र देण्यास नकार दिला होता. त्यानंतर हा चित्रपट संरक्षण मंत्रालयाच्या काही अधिकाऱ्यांना दाखविण्यात आला. त्यानंतर या चित्रपटात काही बदल करण्यात आले असून आता हा चित्रपट १६ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.