अझीम प्रेमजी आशियातील सर्वात दानशूर व्यक्ती, 1.45 लाख कोटींची संपत्ती दान

सामना प्रतिनिधी, मुंबई

समाजसेवेसाठी दिल्या जाणाऱ्या देणगीमध्ये ‘विप्रो’चे संचालक, ज्येष्ठ उद्योगपती अझीम प्रेमजी यांनी बिल गेटस् यांनाही मागे टाकले आहे. त्यांनी गरीबांसाठी देण्यात येणाऱ्या देणगीमध्ये तब्बल 52,750 कोटी रुपयांची काढ केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या एकूण देणगीची रक्कम आता 1 लाख 45 हजार कोटी रुपये इतकी झाली असून ते आशिया खंडातील सर्वात दानशूर व्यक्ती ठरली आहे.

काही वर्षांपूर्वी अझीम प्रेमजी यांनी आपल्याकडील 50 टक्के संपत्ती दान करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार विप्रोच्या नफ्यातील मोठा काटा ते अझीम प्रेमजी फाऊंडेशनला दान करतात. विप्रो लिमिटेडमधील त्यांच्या भागभांडवली मालकीतून येणाऱ्या लाभातील 34 टक्के आर्थिक लाभ हे समाजसेवेसाठी राखून ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. विप्रोमध्ये प्रेमजी यांची वैयक्तिक समभाग मालकीचे मूल्य सुमारे 52,750 कोटी रुपयांचे आहे. प्रेमजी यांच्या या नव्या निर्णयाने ‘अझीम प्रेमजी फाऊंडेशन’ या त्यांच्या सेवाभावी कार्यासाठी असलेल्या संस्थेचा एकूण देणगी कोष 1.45 लाख कोटी रुपयांवर गेला आहे.