बापजन्मची परदेशात झेप, हिंदुस्थानासह ‘या’ पाच देशांमध्ये होणार प्रदर्शित

सामना ऑनलाईन । मुंबई

प्रख्यात रंगभूमी कलाकार निपुण धर्माधिकारी यांचे दिग्दर्शन असलेल्या आगामी ‘बापजन्म’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. सरळसाधी कौटुंबिक कथा असलेल्या या कथेत नेमकं काय पाहायला मिळणार याची उत्सुकता तमाम प्रेक्षकांना लागली आहे. मात्र, मराठी चित्रपटप्रेमींसाठी त्याहीपेक्षा जास्त आनंदाची आणि अभिमानाची बातमी म्हणजे ‘बापजन्म’ हा चित्रपट महाराष्ट्रातच नव्हे तर आता परदेशातही प्रदर्शित होणार आहे. अमेरिका, इंग्लंड, स्वीडन, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर या देशांमध्ये या चित्रपटाचे शो दाखविले जाणार आहेत. एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती सुमतिलाल शाह आणि सिक्स्टीन बाय सिक्स्टी फोर प्रॉडक्शन्सने केली आहे.

‘बापजन्म’ची कथा, पटकथा, संहिता आणि दिग्दर्शन अशी चौफेर जबाबदारी सांभाळणारा निपुण धर्माधिकारी याने आपलं मनोगत व्यक्त केलं. तो म्हणाला की, मला खूप आनंद होत आहे कि ‘बापजन्म’ हा चित्रपट महाराष्ट्रातच नव्हे तर आता अमेरिका, युके, स्वीडन, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर या देशांमध्ये या चित्रपटाचे प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्ताने परदेशात राहणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येणार आहे.

सचिन खेडेकर आणि पुष्कराज चिरपूटकर यांच्यासह ‘बापजन्म’ चित्रपटात शर्वरी लोहोकरे, सत्यजित पटवर्धन आणि आकाश खुराणा यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे सह-निर्माते आहेत केयूर गोडसे, नीरज बिनीवाले, अमृत आठवले आणि निपुण धर्माधिकारी. ‘एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट प्रस्तुत आणि निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘बापजन्म’ हा चित्रपट येत्या २९ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

पाहा ट्रेलर-