बाबा ‘फलाहारी’ यांना अटक

सामना ऑनलाईन । जयपूर

राजस्थानमधील स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू स्वामी कौशलेंद्र प्रपन्नचारी फलाहारी महाराज यांना बलात्कार प्रकरणी शनिवारी अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

राजस्थानमधील अलवर येथे फलाहारी बाबाचा आश्रम आहे. बाबाचे लाखो अनुयायी असून बाबाने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप छत्तीसगडमधील एका २१ वर्षीय तरुणीने केला होता. तरुणी बाबाची भक्त होती. बाबावर निस्सीम श्रध्दा असल्याने पहिला पगार बाबाला अर्पण करण्यासाठी ती ७ ऑगस्टला त्याच्या आश्रमात गेली होती. पण बाबाने खोलीत बोलवून आपल्यावर बलात्कार केला व याबद्दल कुठेही वाच्यता न करण्याची धमकी दिली असे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर छत्तीसगड पोलिसांनी राजस्थानमधील अलवर पोलिसांकडे हे प्रकरण सोपवले. तक्रारीची माहिती मिळताच तब्येत बरी नसल्याचे कारण सांगत हा बनेल बाबा आधीच रुग्णालयात दाखल झाला. पण बाबाची तब्येत व्यवस्थित असल्याचे प्रमाणपत्र रूग्णालयाने दिल्याने शनिवारी त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर बाबाला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने बाबाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.