बबनराव लोणीकर अधिकाऱ्यांवर भडकले, ‘लग्नानंतर वर्षभरात लेकरु होते पण…’


विजय जोशी । नांदेड

‘पाणी पुरवठा योजनेची कामे अपूर्ण आहेत. जवळपास साडेतीनशे कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यात खर्च झाला नाही, ही बाब संतापजनक असून, गेंड्याच्या कातडीचे अधिकारी येथे असून, त्यांना ढोपरापासून कोपरापर्यंत आता म्हशीचे इंजेक्शन द्यावे लागेल, लग्न झाल्यावर वर्षभरात लेकरु होते, मात्र दोन-दोन वर्ष निधी देवून तो खर्च होत नाही. ही बाब गंभीर आहे, तुमचा सर्वांचा इलाज करावा लागेल’, या शब्दात पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. यामुळे सर्वच सभागृह आवाक झाले.

नांदेड जिल्ह्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व ग्रामीण पुरवठा योजनेच्या मार्फत दहा गावच्या पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ शुक्रवारी त्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार तुषार राठोड, जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई पवार जवळगावकर, सभापती मिसाळे, मधुमती कुंटूरकर, शहर भाजपाचे अध्यक्ष संतुकराव हंबर्डे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संतोष पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती.

‘नांदेड जिल्ह्यातील 314 पाणी पुरवठ्याच्या योजना प्रलंबित आहेत, त्यांची कामे अर्धवट आहेत, राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळाला, मुख्यमंत्री पेयजल योजनेसाठी 42 कोटी रुपये मिळाले, जलस्वराज्य योजनेसाठी 49 कोटी रुपये मिळाले, दोन वर्ष होवूनही जवळपास अडीचशे ते तिनशे कोटी रुपयांच्या योजना रखडत पडल्या. निधी तसाच पडला आहे. जनतेचे कामे होत नाहीत, अधिकारी कारणे दाखवितात, त्यामुळे अशा अधिकाऱ्यांची कातडी गेंड्याची झाली आहे, अशा सर्वांना ढोपरापासून कोपरापर्यंत म्हशीचे इंजेक्शन टोचावे लागेल तरच ते सरळ होतील’, अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.

पाणी पुरवठा योजना संदर्भात लोकांच्या तक्रारी येतात, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार यांच्या तक्रारी माझ्यापर्यंत येतात. मात्र आलेला निधी खर्च होत नाही, ही बाब गंभीर आहे. अशा अधिकाऱ्यांविरुध्द कडक कारवाई करा, संबंधित यंत्रणेविरुध्द व कंत्राटदाराविरुध्द गुन्हे नोंदवा, फौजदारी खटले दाखल करा, अशा सूचनाही लोणीकर यांनी केल्या. लग्न झाल्यानंतर वर्षभरात लेकरु होवू लागले आहे, मात्र तुम्हाला निधी देवून सुद्धा दोन-दोन वर्ष तो खर्च होत नाही, ही बाब गंभीर आहे. जागतिक बँकेने आपल्याला कर्ज दिले आहे, हे कर्ज खर्च होत नाही ही बाब संतापजनक असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व कामाबाबत दर आठवड्याला बैठका घेवून त्याचा प्रगती अहवाल तयार करा नाही तर गाठ माझ्याशी आहे, अशा कडक शब्दात त्यांनी तंबी दिली.

नदी, ओढे, हापसे यांच्या पाण्याने अनेकांचे केस गळतात, अनेकांना टक्कल पडले आहेत, असाही शोध मंत्रीमहोदयांनी लावला. अधिकारी वर्गाच्या ढिम्म कारभारामुळे हे सर्व घडते आहे, त्यांना सरळ करा, असे आदेशही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. या बैठकीला मी पूर्वसूचना देवून सुद्धा जिल्हाधिकारी महोदय गैरहजर आहेत, ही बाब मी गांभिर्याने घेतली आहे. त्यांना याचा जाब विचारणार असल्याचे त्यांनी यावेळी सुचित केले. नांदेड जिल्ह्यातील जीवन प्राधिकरण आणि ग्रामीण पुरवठा विभागाच्या गोपाळचावडी, वाजेगाव, गोकुंदा, तळेगाव, केरुर, जारीकोट, कांकाडी, बरबडा, करडखेड, पळसा येथील पाणी पुरवठा योजनेच्या कामांचा ई भूमिपुजन सोहळा यावेळी त्यांच्या हस्ते पार पडला. यावेळी अधिकाऱ्यांना उत्तरे देता आली नाहीत. तर मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी अनेक पदे रिक्त आहेत, अनेक पदे प्रभारी आहेत, त्यामुळे कामे वेगाने होत नसल्याचे सांगितले. लोणीकर यांच्या आजच्या वक्तव्याने अधिकारी वर्गाची मात्र चांगलीच भंबेरी उडाली.