बाबरी, कश्मीर प्रकरणी पंतप्रधानांची खलबते, आडवाणी, उमा भारतींच्या भवितव्यावर चर्चा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

बाबरी पाडल्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण आडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी व केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्यासह १३ जणांविरोधात खटला चालू ठेवण्याचे दिलेले आदेश आणि जम्मू-कश्मीरमधील दगडफेकीचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंत्रिमंडळातील वरिष्ठ नेत्यांशी खलबते केली. या वेळी आडवाणी, उमा भारती यांच्या भवितव्यावरही चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

भारतीय जनता पक्षासाठी संपूर्ण आयुष्य झोकून देणारे लालकृष्ण आडवाणी यांच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली पसंती असतानाच आज बाबरी संदर्भात महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे आडवाणींच्या उमेदवारीचे काय, असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. या आदेशामुळे आडवाणींच्या उमेदवारीला धक्का बसल्याचे मानले जाते. त्याच वेळी हा आदेश आडवाणी यांच्यासाठी इष्टापत्ती ठरण्याची शक्यता भाजपातील काही सूत्रांनी वर्तवली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची अनपेक्षितपणे निवड करून संघाने योग्य तो संदेश दिलाच आहे. राम मंदिर उभारणीच्या आशा त्यामुळे पल्लवित झाल्या आहेत. आता देशभरात सरळ सरळ हिंदू-मुस्लीम मतविभागणी होत असताना बाबरी प्रकरणी आडवाणींच्या बाबतीत आदेश आल्याने फारसा फरक पडणार नाही. उलट प्रखर हिंदुत्ववादी नेत्याला देशाच्या सर्वोच्च स्थानावर संधी दिल्याचा संदेश केडरमध्ये जाईल. त्याचा पक्षाला फायदाच होईल, असा दावा एका वरिष्ठ भाजपा नेत्याने खासगीत बोलताना केला. स्वतः आडवाणी यांनी आजच्या आदेशाबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. मात्र या प्रकरणी दोषी ठरविलेल्या केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी राम मंदिरासाठी प्रसंगी मरण पत्करेन, अशी निर्वाणीची भाषा केली आहे.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जीतेंद्रसिंग यांच्यासोबत आज ७, लोककल्याण मार्गावर खलबते केली.

  • खुशी या गम?
    या निकालामुळे लालकृष्ण आडवाणी अडचणीत आले असतानाच काही जणांना ही इष्टापत्ती वाटत आहे. प्रखर हिंदुत्ववादी नेत्याला देशाचे सर्वोच्च पद म्हणजेच राष्ट्रपतीपद देण्याच्या मुद्दय़ाला पाठिंबा मिळू शकतो असे काही सूत्रांनी सांगितले.
  •  आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्याबाबत चर्चा
  • आडवाणींची प्रतिक्रिया नाही
  • राजीनामा देणार नाही – उमा भारती
  • काँग्रेसकडून राजीनाम्याची मागणी
  • अयोध्येत राम मंदिर होणारच – उमा भारतींची घोषणा

आडवाणींविरुद्धचा हा राजकीय कटच – लालूप्रसाद यादव
‘बाबरी’प्रकरणी भाजपचे ज्येष्ठनेते लालकृष्ण आडवाणी यांच्याविरूद्ध गुन्हेगारी कट रचल्याचा खटला चालविण्याचा निर्णय म्हणजे हा राजकीय कट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यामागे आहेत असा आरोप राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी केला आहे. राष्ट्रपतीपदासाठी आडवाणींच्या नावाची चर्चा होती. पण त्यांना या शर्यतीतून आता बाहेर करण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या अख्तारित सीबीआय आहे. सीबीआयनेच आज न्यायालयात गुन्हेगारी कट रचल्याचा खटला चालवावा अशी मागणी केली होती याकडेही लालूप्रसाद यांनी लक्ष वेधले आहे. भाजपकडून धोकादायक राजकारण केले जात आहे. आपला आणि बाहेरचा असा भेद भाजप करीत नाही. जो मोदींना विरोध करेल त्याच्या विरूद्ध असे राजकारण केले जाते असा आरोपही लालूंनी केला आहे.