चिमुरडीला वाऱ्यावर सोडून निर्दयी आई फरार

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

चंद्रभागेच्या वाळवंटात भक्त पुंडलीक मंदिराशेजारीच दोन महिन्याच्या स्त्री जातीच्या अपत्यास सोडून दोन महिला पसार झाल्या. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी धाव घेतली व पंढरपूर शहर पोलीस ठाण्यास या घटनेची माहिती दिली.काही प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार दोन महिला या बालीकेस सोडून पसार झाल्या आहेत.

पुंडलीक मंदिराशेजारी ठिकाणी लावण्यात आलेले सीसीटीव्ही बंद अवस्थेत आहेत. येथे वारंवार अशा घटना घडत असतात. यापुर्वीही अनेकवेळा मृत अथवा जिवंत बालके चंद्रभागेच्या वाळवंटात सोडून जाण्याचे प्रकार घडले आहेत. या घटनेतील बालीका ही केवळ दिड ते दोन महिने वयाची असून तिला उघडयावरच टाकण्यात आले होते. सुदैवाने काही कार्यकर्त्यांच्या नजरेस ही बालीका आल्याने तिचे प्राण वाचले आहेत.

बेवारस अवस्थेत उघडयावर टाकलेल्या जीवंत अथवा मृत अर्भकांना अनेकवेळा भटक्या कुत्र्यांचे भक्ष झाल्याचे अनेकवेळा निदर्शनास आले आहे. त्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारच्या व इतरही दुदैवी घटना सातत्याने घडतात हे लक्षात घेवून भक्त पुंडलीक मंदीराशेजारी कायमस्वरुपी पोलीसचौकी सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.