बदलापूरच्या तरुणाला 20 लाखांचा ऑनलाइन गंडा

सामना प्रतिनिधी । बदलापूर

ऑनलाइन व्यवहारातून भरघोस नफ्याचे आमिष दाखवून दोघा परदेशी ठगांनी बदलापूरच्या तरुणाला 20 लाखांचा गंडा घातला आहे. व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम आणि जीमेलवरून मयुरेश चौधरीला नफ्याचे आमिष दाखवून 20 लाख रुपये भरण्यास सांगितले. मात्र याचा परतावा न देता त्याची फसवणूक केली.

मयुरेश चौधरीला परदेशी बायनरी ऑप्शन प्लॅटफॉर्म या ट्रेडिंग कंपनीतून लाना डाब्रीज आणि डोनाल्ड स्मिथ यांनी गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित केले. यावेळी त्याला 10 टक्के नफ्याचे आमिष दाखवले. यावेळी पैशांची गुंतवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या दोन बँकांच्या खात्यात तब्बल 20 लाख 35 हजार 427 रुपये ऑनलाइन आणि आरटीजीएस पद्धतीने भरण्यास सांगितले. मात्र भरलेली रक्कम परत न केल्याने आपली फसवणूक झाल्याचे मयुरेशच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने पोलीस ठाणे गाठून तक्रार केली.