कोरसची कमाल

3

कोरस कलाकार म्हणजे संगीताचा आत्मा… कोरसशिवाय गाण्याला माधुर्य येत नाही, मात्र नेहमी गायकाच्या मागे उभे राहून गीताला सूरमयी साथ देणाऱया कलावंतांना गायकांसारखी प्रसिद्ध कधीच लाभत नाही. अशा कोरस गाण्याऱया कलाकारांचे महत्त्व रसिकांपर्यंत पोहोचावे यासाठी कोरसला प्राधान्य देणाऱया हिंदी गीतांचा ‘बहार ए कोरस’ हा पहिला कार्यक्रम 20 एप्रिल रोजी रात्री 8.30 वाजता दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात सादर होणार आहे.

जीवनगाणी निर्मित कोरसने सजलेल्या हिंदी गाण्यांचा नजराणा प्रेक्षकांसमोर सादर करण्याची संकल्पना प्रसाद महाडकर यांची आहे. या कार्यक्रमाच्या वैशिष्टय़ाबाबत ते सांगतात, कोरस गाणारे गायक रंगमंचावर दिसत नाहीत. कारण ते गायकाच्या मागे उभे असतात. त्याऐवजी येथे कोरस गायक मुख्य गायकाच्या जागी उभे राहून गाणार आहेत. मुख्य गायक कोरस गायकांच्या मागे उभे राहून गाणार आहेत. कोरस बेस गीतांचा कार्यक्रम ऑर्केस्ट्रा माध्यमात पहिल्यांदा होत आहे. आतापर्यंत जेवढे कार्यक्रम होतात त्यामध्ये कोरस गाणी फारच कमी होतात, पण ‘बहार ए कोर,’मध्ये होणाऱया प्रत्येक गाण्यात कोरस आहे.

कोरसचे अनोखे प्रकार
कव्वालीमधला कोरस, ए. आर. रेहमान यांनी वापरलेला कोरस, हिंदी भक्तिगीतात तो कशा पद्धतीने वापरलाय, फोक, कोरस कॉयर, कव्वालीतला कोरस असे हिंदी चित्रपटसृष्टीतील हमखास होणारी कोरस गाणी असे अनेक अनोखे प्रकार रसिकांना ऐकायला मिळतील. याशिवाय कोरस गायकांनी स्वतः गायलेली गाणीही सादर होणार आहेत.