बाहुबलीपुढे पाकिस्तान झुकला

सामना ऑनलाईन। इस्लामाबाद

जगभरात धूम उडवणाऱ्या बाहुबली २ पुढे पाकिस्तानीही झुकले आहेत. भव्यदिव्य सादरीकरण, हिंदू संस्कृतीची छाप असलेल्या बाहुबलीने पाकिस्तानात आता पर्यतं साडेचार कोटींची कमाई केली आहे. पाकिस्तानच्या १०० चित्रपटगृहात बाहुबली प्रदर्शित करण्यात आला असून सगळीकडे बाहुबली हाऊसफुलचे बोर्ड पाहावयास मिळत आहेत.

डेक्कन क्रोनिकल या वृतपत्राने याबद्दलची माहिती प्रसिध्द केली आहे. त्यातील माहितीनुसार बाहुबलीमधील स्पेशल इफेक्टसने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. भव्य राजमहाल, युध्दनिती, हिंदू संस्कृतीचे दर्शन या चित्रपटातून होत असल्याने पाकिस्तानी सेन्सॉर बोर्डने आक्षेप घेत चित्रपटाला हिरवा झेंडा दाखवायला नकार दिला होता. पण नंतर चित्रपटातील कोणत्याही दृश्याला कात्री न लावता बाहुबली प्रदर्शित करण्यात आला.

प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच बाहुबली बघण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होत आहे. असे पाकिस्तानी वितरक अमजद रशीद यांनी सांगितले आहे.

दरम्यान नेपाळमध्येही बाहुबली तुफान लोकप्रिय ठरला आहे. नेपाळी हिट सिनेमा चक्का पंजा यालाही बाहुबलीने मागे टाकले आहे.

एस एस राजामौली दिग्दर्शित बाहुबली २ ने १००० कोटीचा आकडा ओलांडला असून आतापर्यत १,२६४ कोटी कमावले आहेत. लवकरच हा आकडा १५०० कोटींचा टप्पा गाठेल असे तज्ञांचे म्हणणे आहे.