लंडनमध्ये बैजू पाटील यांच्या वन्यजीव छायाचित्रांचे प्रदर्शन, लिलाव

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

जागतिक व्याघ्र संरक्षण मोहिमेमध्ये हिंदुस्थानला मोठा बहुमान मिळाला आहे. वन्यजीव छायाचित्रणात 35 पेक्षा अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांना लंडनमधील रॉयल अल्बर्ट हॉल येथे फोटो प्रदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. जागतिक कीर्तीच्या 10 वन्यजीव छायाचित्रकारांनी टिपलेले वाघांचे 80 दुर्मिळ छायाचित्रे या ठिकाणी प्रदर्शित करण्यात येतील. या प्रदर्शनात बैजू यांचे 6 छायाचित्रे असतील.

जागतिक व्याघ्र संरक्षण मोहीम राबवणाऱ्या ‘द क्लिंटन पार्टनरशिप’ या संस्थेने जगातील 150 श्रीमंत व्यक्तींनाही या प्रदर्शनात आमंत्रित केले आहे. प्रदर्शनात छायाचित्रांचा जाहीर लिलाव होईल. त्याद्वारे मिळणारा निधी व्याघ्र संरक्षण मोहिमेसाठी वापरला जाणार आहे.

18 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर दरम्यान हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. बैजू 1 ऑक्टोबरला लंडनला पोहोचतील. ‘आय ऑन द टायगर’ या नावाचे हे प्रदर्शन जागतिक स्तरावरील सर्वात मोठे प्रदर्शन असेल. बैजू यांची निवड झालेली सहा छायाचित्रे याआधी कुठेही प्रकाशित झालेली नाहीत. जीव जोखमीत घालून अथक परिश्रम करत हिंदुस्थानातील बांधवगड, कान्हा, रणथंबोर, ताडोबा अभयारण्यात बैजू यांनी ही छायाचित्रे टिपली आहेत.

करिअरमधील सर्वात सोनेरी क्षण
मागील 25 वर्षांपासून वन्यजीव छायाचित्रणात नावलौकिक मिळवलेल्या बैजू पाटील यांनी रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये आपल्या छायाचित्राचे प्रदर्शन होणे हे करिअरमधील सर्वात सोनेरी क्षण असल्याची प्रतिक्रिया दिली. जागतिक स्तरावरील व्याघ्र संरक्षण मोहिमेमध्ये काम करायला मिळणे हे माझ्यासाठी सर्वात मोठे यश आहे. रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये प्रदर्शनात सहभागी होता येईल, याचा कधी विचार केला नव्हता. पण ही संधी मिळाल्याने खूप आनंद होत आहे. प्रदर्शनातील छायाचित्रांच्या लिलावाद्वारे मिळणाऱ्या निधीचा वापर हिंदुस्थानातील व्याघ्र संरक्षण मोहिमेसाठी सुद्धा होणार आहे. विदेशी पर्यटकांना हिंदुस्तानात आकर्षित करण्यासाठीसुद्धा ही मोहीम उपयोगी ठरणार असून, याद्वारे पर्यटनाला चालना मिळेल असे, ते म्हणाले.

अल्बर्ट हॉलमधील प्रदर्शन कलाकारांसाठी पर्वणी
रॉयल अल्बर्ट हॉल हे ब्रिटनमधील सांस्कृतिक कार्यक्रम आयोजनाचे मुख्य ठिकाण आहे. राणी व्हिक्टोरियाच्या काळात 1871 मध्ये या हॉलचे उद्घाटन झाले होते. ब्रिटिश संस्कृतीतील अनेक कार्यक्रम येथे सातत्याने होत असतात. एका वर्षात जवळपास 390 शो घेण्यात येतात. यात प्रामुख्याने क्लासिकल, रॉक, पॉप, ओपेरा यांचा समावेश होतो. चित्रपटांचे स्क्रिनिंग व पुरस्कार वितरण सोहळे येथे आयोजित केले जातात. नॉन ऑडिटोरियम जागेत वर्षभरात 400 कार्यक्रम होतात. 5,272 हॉलची आसन क्षमता आहे. अल्बर्ट हॉलमधील प्रदर्शन कलाकारांसाठी मोठी पर्वणी आहे.