बजाज कंपनीकडून ‘ इस्कॉन ‘ ला अडीच हजार हॉटपॉट

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

मनपा शाळांत शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना ‘इस्कॉन’ची गरमागरम खिचडी देण्यासाठी बजाज कंपनीकडून सीएसआर फंडातून इस्कॉनला अडीच हजार हॉटपॉट देण्यात आले. या हॉटपॉटचे वाटप महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते आज सोमवारी करण्यात आले.

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमध्ये इस्कॉन परिवाराचे मध्यवर्ती किचन आहे. या ठिकाणाहून शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांना गरमागरम खिचडीचे वाटप होते. महानगरपालिकेच्या शाळांतील गरीब विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन योजनेंतर्गत इस्कॉनची खिचडी मिळावी, याकरिता महापौर नंदकुमार घोडेले यांनी पुढाकार घेत इस्कॉन परिवाराला विनंती केली. इस्कॉन परिवाराने महापौरांच्या विनंतीला मान देत मनपा शाळांतील विद्यार्थ्यांना इस्कॉनची गरमागरम खिचडी देण्याची तयारी दर्शविली. परंतु खिचडी वाटपासाठी हॉटपॉटचे भांडे नसल्यामुळे अडचण निर्माण झाली.

महापौर घोडेले यांनी बजाज कंपनीचे सी. पी. त्रिपाठी यांना सीएसआर फंडातून इस्कॉन परिवाराला हॉटपॉट देण्याची विनंती केली. बजाज कंपनीने सीएसआर फंडातून अडीच हजार हॉटपॉटचे स्टीलचे डबे देण्याची तयारी दर्शविली. अडीच हजार हॉटपॉटचे डबे देण्याचा कार्यक्रम आज सोमवारी इस्कॉनमध्ये घेण्यात आला. या कार्यक्रमास महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, सभापती राजू वैद्य, शिक्षण सभापती मनोज बल्लाळ, महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती सुरेखा सानप, बजाजचे सी. पी. त्रिपाठी आदींची उपस्थिती होती. बजाज कंपनीकडून इस्कॉनला अडीच हजार हॉटपॉटचे डबे देण्यात आले. याद्वारे मनपा शाळांतील १६ हजार ५०० विद्यार्थ्यांना इस्कॉनची गरमागरम खिचडी दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांना खिचडीचे वाटप सुरू झाले असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.