आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप,बजरंगचा ‘सुवर्ण’ धमाका

2

सामना ऑनलाईन, शियाम

जागतिक क्रमवारीत नंबर वन स्थानावर असलेल्या हिंदुस्थानच्या पठ्ठय़ाने आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये मंगळवारी इतिहास रचला. त्याने 65 किलो वजनी गटात कझाकिस्तानच्या सयातबेक ओकसोव याचा 12-7 अशा फरकाने धुव्वा उडवत सुवर्ण पदकाची माळ आपल्या गळ्यात घातली आणि 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावण्यासाठी आपणच प्रबळ दावेदार असल्याचे दाखवून दिले. पहिल्या 60 सेकंदांत 2-7 अशा पिछाडीवर असलेल्या बजरंग पुनियाने सलग 10 गुणांची कमाई करताना प्रतिस्पर्धी कुस्तीपटूला ‘धोबीपछाड’ केले आणि रोमहर्षक विजय मिळवला.

प्रवीणला रौप्य, तर सत्यव्रतला कांस्य

हिंदुस्थानच्या प्रवीण राणाचे सुवर्ण पदक मात्र हुकले. त्याला 79 किलो वजनी गटात रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. इराणच्या बहमान मोहम्मद तैमुरी याच्याकडून त्याला सुवर्ण पदकाच्या लढतीत 0-3 अशा फरकाने पराभूत व्हावे लागले. त्यानंतर सत्यव्रत कडियनने कास्य पदक जिंकले. 97 किलो वजनी गटात त्याने ही कामगिरी केली.

शानदार कामगिरी सुरूच

बजरंग पुनियाने गेल्या वर्षभरात हिंदुस्थानसाठी उल्लेखनीय कामगिरी केलीय. जकार्ता येथील आशियाई गेम्स व गोल्ड कोस्ट येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकल्यानंतर त्याने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकत आपली शानदार कामगिरी सुरूच ठेवली. या स्पर्धेत त्याने प्रत्येक प्रतिस्पर्ध्याला लीलया पराभूत केले हे विशेष. जागतिक स्तरावरील मानाच्या समजल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धांमधून त्याला सातवे गोल्ड मेडल जिंकता आले आहे.