बाळासाहेबांची भेट हा अमृतक्षण

>>हरिश्चंद्र बावकर

समस्त हिंदूंचे श्रद्धास्थान, आम्हा शिवसैनिकांच दैवत, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा! हिंदुच्या संरक्षणासाठी, त्यांचा उज्वल भवितव्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या बाळासाहेबांना १९९२-९३ दहशतवाद्यांकडून धोका निर्माण झाला. प्रत्येक शिवसैनिक बाळासाहेबांचा रक्षणासाठी सज्ज झाला. अर्थातच त्यात मीही अग्रेसर होतो. आम्ही बाळासाहेबांच्या रक्षणासाठी ‘मातोश्रीवर’ व काही दिवस ‘पाच गार्डन’ वडाळा येथे संरक्षणाचे कडे उभे केले. हा काळ म्हणजे माझ्या आयुष्यातील सगळ्यात चांगला काळ होता. जीवन सार्थक झाल्याचं समाधान मिळण्याचा काळ होता. आमच्या दैवताचे आम्ही रक्षण करू शकलो.

माझ्या या दैवताला प्रत्यक्ष भेटण्याचा योग मला १९९५-९६ साली आला. आमच्या विभागीय आमदारांसोबत ‘मातोश्री’वर जाण्याचा योग आला व बाळासाहेबांची भेट झाली. बाळासाहेबांनी जवळ बोलावून माझी प्रेमाने विचारपूस केली व स्वत:समवेत तेथे हजर असलेल्या छायाचित्रकाराकडून माझे स्वतःसोबत एक छायाचित्र काढून घेतले. या छायाचित्राचा ठेवा म्हणजेच मला जगण्याची स्फूर्ती, उर्मी देणारा एक अमृतकुंभ आहे.