यमुनाबाई वाईकर

230

<<बाळासाहेब सणस>>

आपल्या अदाकारीने व आवाजाने लावणी सम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई वाईकर यांनी अधिराज्य गाजविले. यमुनाबाईंनी   अविरतपणे कलेची साधना व समाजाची सेवा केली. त्या शेवटपर्यंत सुस्पष्ट व मधुर आवाजात लावण्या म्हणत होत्या. बैठकीच्या लावणीला त्यांनी वैभव प्राप्त करून दिले. महाराष्ट्रामधील भटक्या जमातीमधील कोल्हाटी (डोंबारी) या समाजात त्यांचा जन्म झाला. लता लोकनाट्य तमाशा मंडळ या नावाने लोकनाटय़ाचा तंबूचा फड सुरू केला. दोन ट्रक, दोन पाली तंबू व ६० ते ६५ कलाकारांचा संच घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात सतत १२ वर्षे तमाशाच्या उद्योगातून लोकरंजनातून, लोकजागृती करू लागल्या. यमुनाबाई स्वतः व्यवस्थापनाचे काम पाहत असत, पण महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीमुळे व कलाकारांच्या फाटाफुटीच्या परिस्थितीमुळे १९७२-७३ साली वरील लोकनाटय़ बंद करावे लागले.

आर्थिक स्थिती पुन्हा बिकट व उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. भावांच्या मुलीच्या व बहिणीच्या साथीने पुन्हा यमुना-हिरा-तारा संगीत पार्टी नावारूपाला आली व महाराष्ट्रात आपली एक वेगळी छाप निर्माण केली. त्यांनी लिहिलेल्या व गायलेल्या अनेक लावण्यांनी रसिकांच्या मनावर मोहिनी घातली. आजही त्यांच्या लावण्यांची जादू आहे तशीच आहे. त्यातील तुम्ही माझे सावकार, आशूक माशूक या लावण्यांनी लोकांना अक्षरशः वेड लावले होते. वयाच्या नव्वदीतही त्यांच्या आवाजाची जादू कायम होती. महाराष्ट्रातील तमाशा कलेची व लावणीची जोपासना करताना महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन १९७७-७८ साली महाराष्ट्र राज्य पुरस्कार देऊन गौरव केला. त्या काळात प्रसिध्दी मिळाल्याने देशात लावणीच्या कार्यक्रमांची सुरुवात झाली. १९८४ व ८६ च्या दरम्यान दिल्ली, कोलकाता, भोपाळ, रायपूर, बिलासपूर या शहरातून तसेच आकाशवाणी व दूरदर्शनवरून त्यांच्या कार्यक्रमास सुरुवात झाली.

कॅलिफोर्निया विद्यापीठातून (अमेरिका) पीएच.डी. पदविका प्राप्त करण्यासाठी तमाशा व लावणी संगीत विषय घेऊन हिंदुस्थानात अभ्यास करण्यासाठी आलेल्या ख्रिस्तीन रॉव या तब्बल एक महिना लावणी, संगीत लावणीचे प्रकार व अदाकारी यांचा अभ्यास वाईत राहून करीत होत्या. ख्रिस्तीन रॉव यांना पीएच.डी. प्राप्त झाल्याचे त्यांनी पत्राने यमुनाबाईंना कळविल्याची आठवण त्या नेहमी सांगत. तमाशाचा फड बहिणी व भाच्या अधिक उत्तम प्रकारे चालवू लागल्याने सामाजिक कार्यात वेळ देण्याबरोबरच कलावंतांसाठीही काही करावे म्हणून तमाशा कला, कलावंत विकास मंडळ, मुंबई या संस्थेच्या आजीव सभासद व सल्लागार राहून त्या कार्य करू लागल्या. महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या तमाशा शिबिरातून लावणी नर्तकींना प्रशिक्षण देऊन नवीन लावणी कलाकार घडवू लागल्या. महाराष्ट्र सन १९८९ मध्ये जागतिक मराठी परिषदेने गौरव प्रतीक पुरस्कार  यमुनाबाईंना देऊन गौरव केला.

महाराष्ट्र गौरव पुरस्कार १९९०, सांगली नगर परिषद पुरस्कार १९९१, वाई नगर परिषद पुरस्कार १९९२, राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार १९९५ मध्ये त्यांना मिळाला होता. तद्नंतरही पुणे महानगरपालिका पुरस्कृत ‘शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार’ १९९५, मध्य प्रदेश येथे अहिल्यादेवी होळकर पुरस्कार १९९९-२०००, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत १९ मार्च २०१० रोजी अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात आले. सामाजिक तळमळ सतत असल्यानेच अखिल महाराष्ट्र कोल्हाटी समाजाच्या परिषदेची निर्मिती करून संस्था रजिस्ट्रेशनपासून सतत १० वर्षे अध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळून समाजसेवा करीत होत्या.

व्यसनाधिन, अशिक्षित समाज व्यसनमुक्त कसा करता येईल व त्यासाठी तळमळ असणाऱ्या यमुनाबाईंनी व समाजबांधवांनी जेजुरी व वाई या ठिकाणी विठ्ठल-रखुमाई मंदिराची स्थापना करून वाईतून पांडुरंगाच्या दिंडीला सुरुवात केली. भागवत धर्माची गोडी समाजात निर्माण केली. पंडित बिरजू महाराज यांच्या समवेत पुणे येथे संगीत लावणी व कथ्थक जुगलबंदी कार्यक्रम सादर करून लावणीचे नवीन पर्व सुरू केले. शेवटपर्यंत त्यांची बुध्दी तल्लख होती.

आपली प्रतिक्रिया द्या