शिवसेनाप्रमुखांच्या जयंती दिनानिमित्त हजारो विद्यार्थी रेखाटणार ‘माझी मुंबई’


सामना ऑनलाईन । मुंबई

प्लॅस्टिकमुक्त मुंबई, पेंग्विनची मुंबई, गणेशोत्सव, मेट्रोची सफर अशी स्वप्नातील ‘माझी मुंबई’ रेखाटण्याची संधी लाखो विद्यार्थ्यांना मिळणार आहे. निमित्त आहे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महापौरांच्या वतीने रविवार 13 जानेवारी रोजी आयोजित केलेल्या बाल चित्रकला स्पर्धेचे. सकाळी 8 ते 11 वाजताच्या दरम्यान पालिकेची उद्याने-मैदानांमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे.

जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पालिका क्षेत्रातील सर्वभाषिक महापालिका प्राथमिक, माध्यमिक, खासगी अनुदानित, विना अनुदानित शाळांतील चित्रकलेची आवड असणाऱया पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. विद्यार्थ्यांना कला सादर करण्यास व्यासपीठ मिळवून देणाऱया स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले आहे.

स्पर्धेचे गट व विषय
– गट क्रमांक 1 – इयत्ता 1 ली ते 2 री, विषय – माझी मुंबई, माझे आवडते खेळणे, मी व माझे कुटुंब.
– गट 2 – इयत्ता 3 री ते 5 वी, विषय – मुंबईतील जत्रा, आम्ही गणपती बनवतो, मेट्रोची सफर
– गट क्रमांक 3 – इयत्ता 6 वी ते 8 वी, विषय – मुंबईतील पेंग्निविनची भेट, कचरामुक्त मुंबई, माझ्या स्वप्नातील मुंबई
– गट क्रमांक 4 – इयत्ता 9 वी ते 10 वी, विषय – मुंबईचे डबेवाले, प्लॅस्टिकमुक्त मुंबई, माझी सुरक्षित मुंबई