तो पार्टी देतो आणि पैसे कमवतो, इंग्लंडमधील हिंदुस्थानी पार्टी मॅनची चर्चा

सामना ऑनलाईन । लंडन

आठवडाभर काम केल्यानंतर एखाद्या विकेण्डला मस्त पार्टी झाली की कसं ताजतवानं व्हायला होतं. अशी पार्टी आपल्याला दररोज करायला मिळाली तर असं वाटल्यावाचून राहत नाही. इंग्लंडमध्ये अशाच प्रकारचे जीवन एक एक हिंदुस्थानी जगत असून फक्त पार्टी करून तो कोट्यावधी रूपये कमवत आहे. बल्ली सिंग असे त्या ‘पार्टी मॅन’चे नाव असून तो जगभरात पार्ट्या झोडत असतो.

तुम्ही म्हणाल काय सुंदर आयुष्य आहे याचं. पार्टी, डान्स, दारू यातच रमत असेल हा माणूस. पण नाही, बल्ली हा अतिशय शांत स्वभावाचा व्यक्ती असून त्याला पार्टी, डान्स, दारूची आवड देखील नाही. या बल्लीची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी असून तो जगभरातील अब्जाधीश लोकांसाठी पार्ट्या आयोजित करतो. प्रत्येक पार्टीला तो हजर असतो मात्र तेथील दारूला तो हात देखील लावत नाही.

बल्ली हा इंग्लंडमधील श्रीमंत व्यक्तीपैकी एक आहे. त्याला बल्ली ‘द मोस्‍ट इंटरेस्‍टिंग मॅन इन इंडिया’ म्हणून देखील ओळखले जाते. बल्ली एका इव्हेंटसाठी कमीत कमी साडे आठ कोटी घेतो. एका पार्टीसाठी त्याने तब्बल १७० कोटी रुपये घेतले होते.

मोठ्या स्ट्रगलनंतर मिळाली संधी

बल्लीचे सुरुवातीचे दिवस फार खडतर होते. तो लंडनमध्ये एक नाईट क्लब चालवायचा तसेच सोबत छोटे छोटे इव्हेंट प्लान करायचा. बरीच वर्षे तो या क्षेत्रात स्ट्रगल करत होता. त्यानंतर २००७ मध्ये बल्लीचे नशीब पालटले. जगप्रसिद्ध गायक सिको तेव्हा लंडनमध्ये आला होता. सिकोची पार्टी बल्लीने आयोजित केली होती. ती पार्टी खूप हीट झाली. त्यानंतर बल्लीने मागे वळून पाहिले नाही. त्याला इंग्लंडंमधल्या मोठ्या मोठ्या उद्योजकांची कामे मिळायला लागली. त्यानंतर २००९ मध्ये त्याने ‘द रिच लिस्‍ट’ नावाची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली. तिथूनच बल्लीचा कोट्याधीश होण्याचा प्रवास सुरू झाला.

शॅम्पेनने घालतो घोड्यांना आंघोळ

बल्लीकडे पैशाची बिलकूल कमी नाही. तो त्याच्या घोड्यांना तब्बल लाखो रुपयांच्या शॅम्पेनने आंघोळ घालतो. त्यासाठी तो जगातल्या कानाकोपऱ्यातून शॅम्पेन आणतो. तसेच घोड्यांचे खाणेही परदेशातूनच येते.