बंधन

नम्रता पवार

वाहन चालविणाऱ्या स्त्रिची वेश्या म्हणून संभावना करणाऱ्या सौदी-अरेबियात स्त्रियांना वाहन चालविण्याचा अधिकार देण्यात आल्याची बातमी अलीकडेच वाचनात आली. गेली अनेक वर्षे या देशातील मुस्लिम स्त्रिया यासाठी लढा देत होत्या. बुरखा व अबायात राहूनही अनेक मूलभूत हक्कांसाठी आज अनेक मुस्लिम स्त्रिया लढाई लढत असताना दिसतात. तेव्हा मात्र नक्कीच त्यांचे कौतुक वाटते.

खरं तर आपल्या धर्मातील स्त्रियांचं जगणं, त्यांची प्रगतीदेखील कधीच सहजसोपी नव्हती परंतु यासाठी आपल्यातीलच सुजाण, कर्त्या पुरुषांनी आपल्या उद्धारासाठी पुढाकार घेतला आणि आपल्याला प्रकाशवाट दाखविली आणि हा शिक्षणाचा वसा आणला. आपल्या पुढच्या पिढीकडे सोपविला…

मात्र मुस्लिम स्त्रियांच्या बाबतीत असं कधीच झालं नाही. वर्षानुवर्षे अनेक मुस्लिम स्त्रिया कुप्रथांमध्ये पिचत असलेल्या आपण पाहत आहोत. खरं तर या मुस्लिम स्त्रियांचं काही अस्तित्व आहे हेच आपण  एक स्त्री या नात्याने विसरून गेलो आहोत. त्यांच्या धर्मात हे असंच चालतं म्हणून अनेकदा आपण त्यांच्याकडे, त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतो परंतु ती मुस्लिम स्त्रिपेक्षा आपल्यासारखीच एक स्त्री आहे हे समजून घ्यायला हवं.

अजूनही मुस्लिम समाजात मुलींच्या शिक्षणासाठी सर्वप्रथम मदरसा हाच पर्याय निवडला जातो. त्याहीपुढे शालेय शिक्षणाची परवानगी मिळाली तर ८० टक्के मुलींना दहावीपर्यंत शिक्षण देऊन एकतर घरी बसवलं जातं वा त्यांचं लग्न करून दिलं जातं. मुलीचे लग्न करून दिल्यानंतरदेखील तिहेरी तलाकची टांगती तलवार या स्त्रियांच्या मानेवर असतेच. खरं तर तलाकनंतरदेखील उदरनिर्वाह हा प्रश्न असतोच. शिक्षणाच्या अभावामुळे अर्थाजनाचं साधन नसल्यामुळे आज अनेक मुस्लिम स्त्रियांना लाचारीचं जगणं जगावं लागत आहे. गर्भनिरोधक साधनांचा वापर करणं पाप असल्यामुळे वारंवारच्या बाळंतपणाला मुस्लिम स्त्रियांना सामोरं जावं लागत आहे. शरिया कायद्याचा दाखला देत अनेक मुस्लिम स्त्रियांना त्यांच्या संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवलं जात आहे.

अनेकदा जेव्हा एखादी काळय़ा बुरख्यातील सोबत कमीतकमी 3-4 चिल्लीपिल्ली असलेली स्त्री पाहते तेव्हा सतत मनात येतं खरंच काय चाललं असेल हिच्या मनात आत्मसन्मान… स्वाभिमान हक्क यांची जाणीव असेल का हिला. शिक्षणाचा अभाव, दारिद्रय़, अधिकाराची वाणवा, कुप्रथा कशी जगत असेल ही… पुरुषप्रधान संस्कृती, धर्माचं जोखड याविरुद्ध बंड करावंसं वाटत असेल का हिला?

खरं तर मुस्लिम शरीयत कायद्यानुसार चालत असले तरी हिंदुस्थानातील मुस्लिम स्त्रियांवर तशी जाचक बंधने नाहीत. जी काही जाचक बंधने आहेत ती त्यांच्या समाजाने वा कुटुंबाने घातलेली आहेत. दुर्दैवाने अजूनही मुस्लिम समाजात स्त्री शिक्षणाचं प्रमाण अत्यल्प आहे. तिहेरी तलाकविरोधात अनेक वर्षे लढा देणाऱ्या शायरा बानोमध्ये आत्मविश्वास जागवला तो तिच्यातील शिक्षणानेच. त्यामुळे आपल्यासाठी कोणीतरी येऊन कधीतरी करील याची निरर्थक वाट पाहण्यापेक्षा स्वतःच्या शिक्षणासाठी, प्रगतीसाठी, स्वातंत्र्यासाठी, मूलभूत हक्कांसाठी प्रत्येक स्त्रीने बंड करायला हवं. दोन पावलं पुढे  आलात तर न्यायव्यवस्था नक्कीच साथ देईल. तोंडी तलाक, बुरखा पद्धत याविरोधात लढा तर द्यायचाच आहे, परंतु यासाठी शिक्षणाची कास धरूनच आपली प्रगती होऊ शकते. हा सकारात्मक बदल प्रत्येक मुस्लिम स्त्रीने लक्षात ठेवायला हवं.