अपघाताची पूर्वसूचना देणे पडले महागात, वाचा कसे ते…

सामना ऑनलाईन । बंगळुरु

बाईकस्वाराला अपघाताची पूर्वसूचना देणे एका तरूणाला चांगलेच महागात पडले आहे. वसंत कुमार (27) असं या तरूणाचे नाव असून बाजूने जाणाऱ्या बाईकवरील पुढे बसवलेलं मुल पडणार असल्याने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र आपल्याला शहाणपण शिकवत असल्याच्या रागाने त्याने वसंतलाच शिविगाळ करत जबर मारहाण केली आहे. या मारहाणीत वसंतच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे.

कॅब ड्रायव्हर असलेला वसंत कुमार शनिवारी त्याच्या भाचीला घेऊन मोटारसायकलवरुन फेरफटका मारण्यासाठी जात होता. वसंत रस्त्याने जात असताना बाजूने एकजण फोनवर बोलत बाईक चालवत असल्याचे त्याच्या लक्षात आले, तेव्हा तो एकदम दचकला. कारण त्या बाईकच्या टाकीवर बसलेलं मुल वळणामध्ये पडायला आलं होतं. वसंत कुमारनं तत्काळ त्या बाईकस्वाराला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या निदर्शनास हे आणून दिले. मात्र मुजोर बाईकस्वाराने उलट वसंतलाच अश्लील शिविगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली. वसंतनेही त्याच्या कानशीलात लगावली मात्र तोपर्यंत त्याचे दोन – तीन साथीदार आले आणि कुमारला बेदम मारहाण केली. त्यातील एकाने वसंतच्या डोळ्यावर ब्लेडने वार केला. वसंतने आरडाओरड केल्याने हल्लेखोर पसार झाले. तोपर्यंत भाचीने त्याच्या बहिणीला फोनकरुन घटनास्थळी बोलावलं. यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वसंतकुमारला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्याच्या डोळ्याला गंभीर इजा झाल्यानं त्याला पुढिल उपचारासाठी नेत्र विशेषज्ञाकडे दाखल करण्यात केलं.

दरम्यान, वसंतच्या बहिणीने घटनास्थली जाऊन चौकशी केली असता हल्ला करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली असून उमेश असं त्याचे नाव आहे, तर त्याच्या एक साथीदाराचे नाव मंजूनाथ असल्याची माहिती मिळाली. या प्रकरणी अमृथाहल्ली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हल्ल्यात वसंत कुमार गंभीर जखमी झाल्याचे कळताच आरोपी फरार झाले असून त्यांना लवकरात लवकर पकडणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.