बांग्लादेशच्या माजी पंतप्रधानांना ५ वर्षांचा तुरुंगवास

सामना ऑनलाईन । ढाका

बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान आणि बांग्लादेश राष्ट्रवादी पार्टीच्या प्रमुख बेगम खालेद झिया (७२) यांना ५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गुरुवारी ढाक्यातील न्यायालयाने भ्रष्टाचारप्रकरणी सुनावणी करताना झिया यांना ही शिक्षा सुनावली. या प्रकरणात झिया यांचा मुलगा तारिक रहमान आणि इतर चार जणांना १० वर्षांसाठी तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. बेगम खालेदा झिया यांनी दोन वेळा बांग्लादेशचे पंतप्रधानपद भूषवले आहे.

न्यायालयाच्या निर्णयाविरोधात झिया उच्च न्यायालयात अपील करू शकतात. मात्र, येत्या डिसेंबरमध्ये होणारी निवडणूक त्यांना लढवता येणार नाही. दरम्यान, सत्ताधारी झिया यांच्याविरोधात राजकीय सूड उगवण्याचे काम करीत आहेत. उच्च न्यायालयात ते तोंडावर पडतील, असे झिया यांचे वकिल खांडकर महबूब हुसैन म्हणाले.

न्यायालयाने झिया यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर झिया समर्थकांनी न्यायालयाच्या परिसरात गोंधळ घातला. यामध्ये ५ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्याचबरोबर दोन मोटारसायकली पेटवून देण्यात आल्या. समर्थकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला.

काय आहे प्रकरण?
२००१ ते २००६ मध्ये सत्तेत असताना ‘झिया अनाथआश्रम’ ही केवळ कागदोपत्री दाखवण्यात आली होती. या ट्रस्टच्या नावाने मोठ्या प्रमाणावर परदेशी देणग्या घेण्यात आल्या होत्या. ‘झिया अनाथआश्रमा’साठी मिळालेल्या २,५२,००० अमेरिकन डॉलरचा अपहार करण्यात आला आणि याच प्रकरणात बेगम खालेदा झिया दोषी ठरल्या.