पंचवीस वेळा ऑपरेशन करूनही हातापायावर उगवले झाड

सामना ऑनलाईन । ढाका

पंचवीस वेळा ऑपरेशन करूनही हातापायावर पुन्हा झाड उगवल्याने बांगलादेशच्या ‘ट्री मॅन’ने पुन्हा एकदा रुग्णालयात धाव घेतली आहे. अबुल बाजंदर (28) असे त्याचे नाव आहे. अबुलच्या हातापायाच्या त्वचेवर झाडाप्रमाणे फांद्या फुटू लागतात. वयाच्या दहा वर्षांपासून तो या आजाराने ग्रस्त आहे.

ambul

Epidermodysplasia Verruciformis असे या आजाराचे नाव आहे. यामुळे अबुलच्या शरीराच्या अनेक भागांवरील त्वचा झाडाच्या सालीसारखी झाली आहे. त्याच्या हातापायावर जवळ जवळ पाच किलो वजन असलेली झाडासारखी दिसणारी त्वचा उगवली आहे. रोगप्रतिकारक शक्तीमधील उणीवांमुळे हा आजार होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या आजारामुळे HPV (human papilloma virus) चा धोका संभवतो. तसेच त्वचेचा कॅन्सर होण्याचीही शक्यता बळावते. पेशींच्या वाढीशी संबंधित असलेल्या या आजाराचे जगभरात मोजकेच रुग्ण आहेत. अबुलवर 2016 नंतर पंचवीस शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यानंतर त्याने उपचार घेणे बंद केले व तो घरी निघून गेला. अबुलचा आजार हा दुर्मिळ असल्याने त्यावर नियमित उपचार घेणे गरजेचे आहे. पण आमचे न ऐकता तो अर्धवट उपचार घेऊन घरी निघून गेला. यामुळे आता गुंतागुंत वाढली आहे, असे ढाका मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमधील डॉक्टर समंथा लाल सेन यांनी सांगितले आहे.