अल्पवयीन मुलगी 1 लाख, सज्ञान 50 हजार; पालघरमध्ये मुलींच्या तस्कराला अटक

सामना ऑनलाईन । वसई

नोकरी मिळवून देण्याचे अमिष दाखवून बांगलादेशी मुलींना हिंदुस्थानात आणून त्यांना वेश्या व्यवसायासाठी विकणाऱ्या बांगलादेशी दलालाच्या पालघर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. मोहम्मद सैदुल मुस्लिम शेख असं या दलालाचे नाव असून त्याने बांगलादेशातून अनेक मुलींना आणून देहविक्रीच्या नरकात लोटले आहे. पालघर पोलिसांच्या वसई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या हाती लागलेला हा दलाल ठाणे, मुंबई आणि पुणे पोलिसांच्याही रडारवर होता.

बांगलादेशातून गरीब आणि गरजू मुलींना हेरून त्यांना हिंदुस्तानात नोकरीचं अमिष दाखवून, छुप्या मार्गाने मोहम्मद सैदुल मुंबईत आणायचा. मात्र मुंबईत आणल्यावर त्यांना वेश्याव्यवसायत ढकलत होता. पालघर पोलिसांनी 2016 साली देहविक्रीच मोठं रॅकेट उद्धवस्त केलं होतं. त्यावेळी मोहम्मद सैदुलसह आणखी सात आरोपींचा पालघर पोलीस शोध घेत होते. गुरुवारी आरोपी सैदुल कल्याण डोंबिवली येथे येणार असल्याची माहिती मिळताच वसईच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने साफळा रचून त्याला मोठ्या शिताफीने अटक केली आहे. सैदुलवर मुलींच्या तस्करीचे अनेक गुन्हे दाखल असून मुंबईत दोन, पुण्यात दोन आणि पालघर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. आत्ता पर्यंत त्याने पाचशे पेक्षा जास्त मुलींची तस्करी केल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

मोहम्मद सैदुल हा मुळचा बांगलादेशी असून, पोलिसांनी त्याच्याकडून हिंदुस्थानातील पॅनकार्ड आणि आधार कार्ड जप्त केले आहे. सैदुल बांगलादेशातून आणलेल्या मुलींचीही बोगस कागदपत्रांच्या आधारे पॅनकार्ड व आधारकार्ड बनवायचा. धक्कादायक म्हणजे हा दलाल बांगलादेशी तरूणींना 50 हजारांपासून ते एक लाखाला तीन महिन्यांसाठी विकत होता,तसेच तीन महिन्यांनंतर दुसरीकडे विकायचा. मुलगी जर अल्पवयीन असेल तर एक लाख रुपये आणि सज्ञान असेल तर 50 ते 60 हजार रुपयांना विकायचा. तसेच मुलींच्या घरच्यांना शंका येवू, नये म्हणून तो काही रक्कम हवाला मार्फत मुलींच्या घरी नियमीत पाठवायचा. बांगलादेशी मुलींच्या तस्करीचा सुत्रधार पोलिसांच्या हाती लागल्याने या प्रकरणी मोठं रॅकेट उघडं होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.