हिंदुस्थान हरल्याने नैराश्याची लाट, बांग्लादेशी तरूणाची आत्महत्या

सामना ऑनलाईन। ढाका

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने हिंदुस्थानचा दारुण पराभव केला. हा धक्का सहन न झाल्याने एका बांग्लादेशी चाहत्याने रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली. विद्युत (२५) असे या तरुणाचे नाव असून तो हिंदुस्थानी क्रिकेट टीमचा मोठा चाहता होता.

सेमी फायनलमध्ये हिंदुस्थानने पाकिस्तानला हरवल्यामुळे विद्युत खुप खुश होता. फायनलमध्येही हिंदुस्तानच बाजी मारेल असा त्याला विश्वास होता. सचिन तेंडुलकर, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, युवराज सिंग हे त्याचे आवडते खेळाडू होते. क्रिकेटचे त्याला प्रचंड वेड होते. हिंदुस्थानचे सर्वच क्रिकेट सामने तो उत्साहात बघायचा. बांग्लादेशी असूनही तो कायम हिंदुस्थानी क्रिकेटर्सचा चाहता होता. पण रविवारच्या सामन्यात पाकिस्तानने हिंदुस्थानची केलेली दैना त्याला पाहवली गेली नाही. सामना संपल्यानंतर तो घराबाहेर पडला पण परत आलाच नाही. त्यानंतर त्याच्या घरातल्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले.

आत्महत्या करण्यापूर्वी हिंदुस्थान हरल्यामुळे आपण निराश झाल्याचे त्याने मित्रांना सांगितले होता. तो खुपच उदास झाला होता.अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.