बांगलादेशी चाहत्यांचा सोशल साइटवर उन्मादी उच्छाद

सामना ऑनलाईन, लंडन

पावसाच्या कृपेने यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणाऱ्या बांगलादेशी संघाच्या चाहत्यांची गत सध्या डबक्याबाहेरच्या महाकाय बैलाशी स्पर्धा करणाऱ्या बेडकासारखी झाली आहे. टीम इंडियापाठोपाठ उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या बांगलादेशच्या चाहत्यांना प्रचंड गर्व झाला आहे. आपल्या संघाच्या विजयाच्या उन्मादात त्यांनी हिंदुस्थानी संघ व क्रिकेटपटूंबद्दल सोशल साइटस्वर आक्षेपार्ह पोस्ट करीत आपल्या लायकीचे दर्शन क्रिकेट जगताला घडवले आहे.

यापूर्वी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेप्रसंगी असेच अखिलाडू मतप्रदर्शन बांगलादेशी क्रिकेटशौकिनांनी केले होते. मात्र टीम इंडियाने मीरपूरच्या लढतीत बांगलादेशला पराभवाची धूळ चाखायला लावत ‘बांगला’ क्रिकेट शौकिनांच्या ‘डराव डराव’ला चोख प्रत्युत्तर दिले होते. १५ जूनच्या हिंदुस्थानच्या उपांत्य लढतीआधीच टीम इंडियावर आक्षेपार्ह जहरी टीका करीत बांगलादेशी क्रिकेट फॅन्सनी सोशल साइटस्वर आपल्या घमेंडीचे विकृत दर्शन पुन्हा घडवले आहे.