बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खलिदा झिया यांना तुरुंगवास

सामना ऑनलाईन । ढाका

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि विरोधी पक्ष ‘बीएनपी’च्या नेत्या बेगम खलिदा झिया यांना ढाका विशेष न्यायालयाने पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे झिया यांना या वर्षी डिसेंबरमध्ये होणारी सार्वत्रिक निवडणूक लढविण्यास बंदी घातली जाण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयानंतर ‘बीएनपी’चे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. ढाकासह अनेक ठिकाणी पोलिसांबरोबर झटापट झाली. बांगलादेशात बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
पंतप्रधान असताना २००१ ते २००६ या काळात बेगम खलिदा झिया यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी ही शिक्षा ठोठावली आहे. याच प्रकरणी झिया यांचा मुलगा तारीक रहमान आणि इतर चार जणांना १० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.

ढाकामध्ये तणाव
बेगम खलिदा झिया यांना तुरुंगवासाची शिक्षा ठोठावल्यानंतर ‘बीएनपी’ कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. ढाकासह काही शहरांत तणाव वाढला असून रॅपिड ऍक्शन फोर्स तैनात केले आहे.

काय आहे प्रकरण
-बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी अर्थात ‘बीएनपी’च्या अध्यक्ष असलेल्या बेगम खलिदा झिया या १९९१-९६ आणि २००१ ते २००६ असे दहा वर्षे पंतप्रधान होत्या.
– २००१ ते २००६ या काळात बेगम झिया यांनी आपल्या झिया अनाथाश्रम ट्रस्टसाठी कोटय़वधी रुपयांची देणगी जमा केली. त्यातील परदेशी देणग्यांपैकी २१ दशलक्ष टक्क्यांचा घोटाळा (सुमारे १ कोटी ७० लाख रुपये) केल्याचा ठपका झिया यांच्यावर ठेवला आहे.
– खटला रद्द करण्यासाठी झिया यांनी बांगलादेश सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती, मात्र न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आणि ढाका विशेष न्यायालयात खटला चालविण्याचे आदेश दिले.
– आज झिया यांना पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावल्यामुळे डिसेंबर महिन्यात होणाऱया निवडणुका लढविण्यासही बंदी घातली जाऊ शकते.