नोटांमध्ये गोमांसाचा वापर?

सामना ऑनलाईन । लंडन

हिंदुस्थानमध्ये गोवंशहत्या आणि गोमांसाचा मुद्दा जोर पकडत असताना ब्रिटनच्या बँक ऑफ इंग्लंडने घेतलेल्या निर्णयाला शाकाहारी आणि हिंदुस्थानी नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. ब्रिटनच्या बँक ऑफ इंग्लंडने नोटांमध्ये गोमांसाचा वापर करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. बँकेच्या निर्णयाला इंग्लंडमधील अनेक धर्माच्या लोकांनी विरोध केला आहे.

बँकेने नोटांमध्ये गोमांसाचा वापर करण्याच्या निर्णयावर लोकांच्या प्रतिक्रिया मागवल्या आहेत. बँकेच्या निर्णयाविरोधात ८८ टक्के लोकांनी मतदान करत हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. ब्रिटनमधील मंदिरांमध्ये या नोटांवर बंदी लादण्यात आली आहे. नोटांमध्ये गोमांसाऐवजी पाम तेल वापरण्याचा सल्ला काही जणांनी दिला होता. मात्र नोटांमध्ये पाम तेल वापरल्यास पर्यावरणाचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे बँकेचे म्हणणे आहे.

बँक आपला निर्णय मागे न घेता ५ पाउंड आणि १० पाउंडच्या नोटांची छपाई सुरू ठेवणार आहे. तसेच २०२० मध्ये छापण्यात येणाऱ्या २० पाउंडच्या नवीन नोटांमध्येही गोमांसाचा वापर करण्यात येणार आहे. बँकेच्या या निर्णयाविरोधात ३ हजार ५५४ लोकांनी आपले मत नोंदवले आहे. यापैकी ८८ टक्के लोकांनी नोटांमध्ये गोमांस वापरण्याला विरोध केला आहे.