काँग्रेस नेते प्रकाश देवतळे यांच्या सहकारी संस्थेवर जप्तीची कारवाई

1

सामना प्रतिनिधी । चंद्रपूर

चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देवतळे हे अध्यक्ष असलेल्या एका सहकारी संस्थेवर बँकेने कारवाई करीत चार ट्रक जप्त केले असून, ८१ लाखांच्या वसुलीसाठी प्राधिकरणात धाव घेतली आहे. कर्ज बुडवण्याचा हा प्रकार असल्यानं या संस्थेमधील पदाधिका-यांच्या वैयक्तिक मालमत्ता जप्त करण्याच्या तयारीत सध्या बँक आहे. या प्रकरणामुळं काँग्रेसची मोठी बदनामी होत आहे.

पैनगंगा खोरे वाहतूक सहकारी संस्था, कोरपना या नावानं २०११ मध्ये संस्था स्थापन करण्यात आली. प्रारंभी दोन वर्षे याचं अध्यक्षपद काँग्रेसचे उपगटनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे होतं. त्यानंतर ते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्याकडे आलं. या संस्थेनं पक्षातीलच शेकडो कार्यकर्त्यांना भागधारक करून त्यांच्याकडून मोठी रक्कम गोळा केली. संस्थेच्या माध्यमातून मोठा व्यवसाय करायचा आणि त्याच्या नफ्यातून भागधारकांना पैसे द्यायचे, असा हा फ़ंडा होता. त्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रकडून २०१२ मध्ये दोन ट्रकसाठी ३७ लाख ५० हजार आणि २०१३ मध्ये आणखी दोन ट्रकसाठी ४३ लाख ५० हजार म्हणजे एकूण ८१ लाखांचं कर्ज या संस्थेनं घेतलं. प्रारंभी दोन वर्षे या संस्थेनं नियमित कर्ज भरणा केला. मात्र, त्यानंतर तो थांबला. गेल्या चार वर्षांपासून हे कर्ज भरण्यात आलेलं नाही. त्यामुळं महाराष्ट्र बँकेनं नियमाप्रमाणे नोटीसी बजावल्या. पण त्याला प्रतिसाद न मिळाल्यानं बँकेनं या संस्थेचे चारही ट्रक जप्त केले. या ट्रकांचा लिलाव करून पैसे वसूल करण्याचा प्रयत्न बँकेनं तीनदा केला. मात्र, ट्रकांची झालेली जर्जर अवस्था बघता तीनही लिलावांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळं हे ट्रक अजूनही जागेवरच उभे आहेत. यानंतर बँकेनं थेट वसुली प्राधीकरणाकडे धाव घेतली आणि प्रकरण प्रवीष्ट केलं.

थेट वसुली प्राधीकरणानं बँकेच्या बाजून निर्णय दिल्यास या संस्थेतील पदाधिका-यांच्या वैयक्तीक मालमत्तांवर टाच येण्याची मोठी शक्यता आहे. हे कर्जबुडवीचं प्रकरण असल्यानं आणि सध्या देशात कर्जबुडव्यांची संख्या वाढल्यानं याप्रकरणी बँक कठोर कारवाईच्या भूमिकेत आहे. एकीकडे बँकेचं हे लाखो रुपयांचं प्रकरण सुरू असतानाच दुसरीकडे भागधारकांचीही फसवणूक झाल्याचं चित्र आहे. या संस्थेतील भागधारकांना एक छदामही आतापर्यंत मिळालेला नाही. संस्था तोट्यात दाखवल्यानं भागधारकांना पैसे कुठून देणार, असा प्रश्न निर्माण झाल्यानं भागधारकांतही मोठा असंतोष निर्माण झालाय. मात्र, हे भागधारक त्याच पक्षाशी जुळले असल्यानं बाहेर बोलण्यास घाबरत आहेत. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाचा हा प्रताप वरिष्ठांकडे पाठवण्याच्या हालचाली काहींनी सुरू केल्या. पण यामुळं पक्षाची नाहक बदनामी जिल्ह्यात होत आहे. यासंदर्भात जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या प्रकरणावर कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला. आम्ही कायदेशीर लढाई लढू. आमचं काहीही चुकलेलं नाही, असं त्यांनी सांगितलं.