नोटाबंदी हाय हाय, बँक कर्मचा-यांचा आंदोलनाचा इशारा

11


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

नोटाबंदीनंतर बँक कर्मचा-यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याने वैतागलेल्या बँक कर्मचा-यांनी २८ डिसेंबरला आंदोलनाचा इशारा दिला आहे. सर्व बँका आणि शाखेत रोकड प्रमाण निश्चित करण्यात यावे, सर्व एटीएममध्ये पुरेसे पैसे जमा करावेत अशी मागणी बँक कर्मचा-यांनी केली आहे. यासंदर्भात बँक संघटनांतर्फे २९ डिसेंबरला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनाही एक निवेदन देण्यात येणार आहे.

नोटाबंदीच्या निर्णयाला महिना उलटून गेला. तरी अद्यापही बँकेत पुरेशा नवीन नोटा नसल्याने बँक कर्मचा-यांना रोजच नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. या सगळ्याचे दडपण येत असल्याने बँक कर्मचा-यांच्या प्रकृतीवर त्याचा परिणाम होत आहे.

नोटाबंदीमुळे बँक कर्मचा-यांना ज्यादा काम करावे लागत आहे. अतिताणामुळे ड्यूटीवरच बँक कर्मचा-यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यापार्श्वभूमीवर बँकेत, रांगेत मृत्यू झालेल्याच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्यात यावी, बँक कर्मचारी व अधिका-यांच्या सुरक्षेततेची हमी बँक व आरबीआयने द्यावी आणि बँकेत उशिरापर्यंत काम करणा-या कर्मचारी आणि अधिका-यांना त्याचा मोबदला द्यावा अशी मागणी बँक संघटनांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या