पंपचालकांचा पेट्रोल पंपावर डेबिट,क्रेडीट कार्ड स्वीकारण्याचा निर्णय

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

जबरदस्त विरोधामुळे पेट्रोल पंपावर डेबिट किंवा क्रेडीट कार्ड वापरल्यास १ टक्के अतिरिक्त शुल्क स्वीकारण्याचा निर्णय बँकांनी तूर्तास मागे घेतलाय. बँकांनी घेतलेल्या या निर्णयाबाबत केंद्रीय अर्थमंत्रालयाला काहीच माहिती नव्हती. ही माहिती मिळताच बँकांना तातडीने हे अतिरिक्त शुल्क मागे घेण्यास सांगण्यात आलं.

पेट्रोल पंपावर डिजिटल व्यवहारांवर १ टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय बँकांनी जाहीर केला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या पेट्रोल पंपचालकांनी सोमवारपासून इंधन विक्री रोखीनेच करणार कोणतेही कार्ड स्विकारणार नाही, असा इशारा दिला होता. नोटबंदीला ६० दिवस उलटून गेले असले तरी अद्याप पुरेशी रोकड बँका, एटीएम मध्ये उपलब्ध नसल्यामुळे ग्राहकांना कार्ड पेमेंटने दिलासा दिला होता. मात्र बँकांनी इंधन खरेदीसाठी कार्ड वापरल्यास १ टक्का अतिरिक्त शुल्क आकारण्याचे ठरवलं होतं. हे शुल्क ग्राहकांकडून वसूल न करात ते पेट्रोल पंप चालकांकडून बँका वसूल करण्यात येणार होतं. त्यामुळे पेट्रोलपंप चालक संतापले होते.

नोचाबंदीनंतर केंद्र सरकारने कार्डने व्यवहार केल्यास पेट्रोल-डिझेलवर ०.७५ टक्क्यांची सूट ग्राहकांना देण्याचे ठरवले आहे. मात्र दुसरीकडे बँकांनी अतिरिक्त भार लावून पंपचालकांना अडचणीत आणलं होतं. आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि अॅक्सिस या बँकांनी शनिवारी रात्री सर्व पेट्रोल पंपांना याबाबत सूचना पाठवली होती.

या तीन बॅंकांनी देशातील जवळपास ६० टक्के पेट्रोल पंपांना पॉइंट ऑफ सेल मशीन दिलेल्या आहेत. ही नोटीस आल्यानंतर पेट्रोल पंप चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हा निर्णय जर मागे घेतला नाही तर आम्ही कार्ड स्वीकारणार नाही असे त्यांनी बॅंकांना कळविले होते.