बप्पीदा…

>> नमिता वारणकर

आजवर अनेक रेकॉर्डस् स्वतःच्या नावावर नोंदवणाऱया बप्पी लाहिरी यांनी 2019मध्ये ‘लकी’ या मराठी सिनेमासाठी एक मराठी ‘कोपचा गाणे’ गायले. त्यानिमित्त त्यांची भेट झाली. यावेळी आपल्या गाण्याच्या प्रवासाविषयी उत्स्फूर्तपणे बोलून त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. त्याच आठवणी पुन्हा एकदा… 

बप्पी लाहिरी. शास्त्रीय संगीताचा ठाशीव पाया घेऊन पश्चिमी संगीताला आपलंसं करत स्वतःचे वेगळे स्थान अबाधित ठेवले आहे…

आपल्या तडफदार, जादुई सुरांच्या मोहिनीने रसिकांना, संगीतप्रेमींना अक्षरशः घायाळ करणारे सुप्रसिद्ध गायक, संगीतकार बप्पी लाहिरी…बंबई से आया मेरा दोस्त, आय एम अ डिस्को डान्सर, याद आ रहा है तेरा प्यार, यार बिना चैन कहां रे, तम्मा तम्मा लोगे, ऊ ला ला ऊ ला ला… अशी त्यांनी गायलेली अनेक सदाबहार गाणी ऐकली की, पावलं आजही थिरकायला लागतात. आजच्या तरुणांनाही त्यांची भुरळ पडली नसली तर नवलच वाटावं असे बप्पीदा… सगळ्यांचे चाहते… हिंदुस्थानी सिनेमाच्या योगदानाकरिता ‘बुक वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड’ने सन्मानित झालेले… बॉलीवूड, हॉलीवूड यांसह बंगाली, पंजाबी, मल्याळम, तेलुगू, कन्नड, उडिया अशा अनेक भाषांतील गाण्यांना त्यांनी संगीत दिले आहे.

आजवर अनेक रेकॉर्डस् स्वतःच्या नावावर नोंदवणाऱया बप्पी लाहिरी यांनी नुकतेच ‘लकी’ या मराठी सिनेमासाठी एक मराठी ‘कोपचा गाणे’ गायले आहे. त्यानिमित्त त्यांची भेट झाली. यावेळी आपल्या गाण्याच्या प्रवासाविषयी उत्स्फूर्तपणे बोलून त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

पूर्वी गायलेल्या आणि आता ते गात असलेल्या गाण्याविषयी बप्पी लाहिरी सांगतात, माझी तम्मा तम्मा, रात बाकी बात बाकी… अशी काही जुनीच गाणी जास्त प्रसिद्ध आहेत. ज्याप्रमाणे काही जण सदासर्वकाळ सुपरस्टार असतात त्याप्रमाणे माझी सर्वच गाणी आठवणीत राहणारी आणि बहारदार आहेत. आजचे तरुण माझ्या जुन्या गाण्यांवर बेभान होऊन नाचतात. काही वर्षांपूर्वी मी एक मराठी गाणं गायलं होतं. त्यानंतर आता बऱयाच वर्षांनी ‘लकी’ या मराठी सिनेमासाठी गाणं गायची संधी मिळाली. आजच्या जनरेशनचा सिनेमा आहे. यातलं ‘कोपचा साँग’ नक्कीच हिट होईल. भविष्यात अजूनही मराठी सिनेमासाठी गाणी गाण्याची आशा ते व्यक्त करतात.

वयाच्या तिसऱया वर्षापासून ते संगीताशी जोडले गेले. त्यांचे गुरू समता प्रसाद यांच्याकडून तबला शिकले. आई-वडील दोघेही शास्त्रीय गायक, त्यामुळे घरातच संगीताची परंपरा त्यांना लाभली. यातून लहानपणी आपसूकच संगीताची आवड निर्माण झाली. गुरूंकडून शिक्षण घेतले असल्यामुळे त्यांच्या गाण्यात डिस्को, उडती चाल, चमक-दमक जशी कानावर पडते तशी काही गाण्यांमध्ये शालीनता आणि अंतर्मुखताही जाणवते. म्हणूनच ती संगीतप्रेमींना कायमस्वरूपी लक्षात राहतात. त्यामुळेच पाश्चात्त्य संगीताला हिंदुस्थानी टच देण्यासाठीही ते प्रसिद्ध आहेत.

मराठी चित्रपटसृष्टी प्रचंड मोठी आहे. तिची परंपरा फारच जुनी आहे. तेव्हाच्या काळी व्ही. शांताराम, दादा कोंडके यांचे सिनेमे पाहून मोठा झालो. मुंबईत करीअर करण्यासाठी जेव्हा आलो तेव्हा एका मोठय़ा मराठी माणसामुळेच मला खरी ओळख मिळाली. त्यामुळे मराठी सिनेमासाठी गाणं गायला मिळाल्याचा आनंद आहे. वेगवेगळ्या भाषांत गाणी गायली असली तरीही मराठी ही महाराष्ट्राची भाषा आहे. त्यामुळे या भाषेत गाणं गाण्याचा अनुभव छान होता. मराठी लोकांबरोबर काम करायला मला आवडतं. माझे गुरू आणि आईवडिलांमुळे गाण्याशी जोडला गेलो आणि गाऊ लागलो. यापुढेही गात राहीन, असे सांगून ते आपल्या जुन्या आठवणींनी भारावून जातात.

सिद्धिविनायकावर त्यांची प्रचंड श्रद्धा आहे. याबद्दल ते सांगतात की, माझ्या स्टुडिओत जिथे मी गाणी संगीतबद्ध करतो, तिथे गणपतीची प्रतिष्ठापना एका मराठी माणसाकडूनच करवून घेतली आहे. गणपतीची नियमित आराधना करतो. याकरिता मी त्याचे सोन्याचे ताईत माझ्या गळ्यातच धारण केले आहे. हे माझ्यासाठी एवढं भाग्यशाली ठरलं की, त्यानंतर मला जेवायलासुद्धा वेळ मिळत नसे. एवढं काम मिळू लागलं. यापुढेही मराठी सिनेमासाठी गाणी गाण्याची संधी मिळावी, अशी इच्छा ते व्यक्त करतात. यावर्षी हॉलीवूडमध्येही ‘लायन’, ‘गार्डियन ऑफ गॅलॅक्सी’, ‘डोन्ट मिस यू मोआना’ हे त्यांचे तीन चित्रपट नुकतेच प्रदर्शित झाले आहेत. त्यामुळे यंदाचं वर्ष त्यांच्यासाठी लकी आहे, असं त्यांना वाटतंय.

नव्या गायकांना संयम आणि अभ्यासाची गरज
‘‘आज बरेच नवे गायक संगीत क्षेत्रात येत आहेत, या माध्यमात आपलं स्थान निर्माण करत आहेत. त्यांना काय सल्ला द्याल?’’ असं विचारता बप्पीदा सांगू लागतात, ‘‘सगळेच नवे गायक चांगलं गातात. मात्र जे अगदीच नवीन आहेत त्यांनी संयम बाळगणे आवश्यक आहे. याबरोबच त्यांनी लतादीदी, रफीसाहेब, किशोर कुमार, आशा भोसले कसे गातात याचा अभ्यास करावा, त्यांचं निरीक्षण करावं, त्यांची गाणी ऐकावीत.

[email protected]