बापूजींचे दहा फिटनेस फंडे

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुस्थानसह संपूर्ण जगाला अहिंसेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधी यांची आज जयंती. सत्याग्रह आणि उपोषण या मार्गांनी त्यांनी इंग्रज सत्तेला सळो की पळो करून सोडलं. यासाठी त्यांची मानसिकच नाही तर शारीरिक ताकदही पणाला लागली होती. हीच शारीरिक तंदुरुस्ती कायम राखण्यासाठी बापूजी ज्या मार्गांचा अवलंब करत ते मार्ग आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत खूप उपयुक्त ठरू शकतात.

बापूजींचे १० फिटनेस फंडे-
१. अहिंसा- आता तुम्ही विचाराल की अहिंसेचा आणि आरोग्याचा काय संबंध? हो, संबंध आहे. अहिंसावादी विचारसरणी तुम्हाला शांतताप्रिय बनवते. त्यामुळे हायपरटेन्शन आणि हृदयविकारासारखे आजार होण्याचं प्रमाण घटतं.

२. लवकर झोपणे आणि लवकर उठणे- शरीराला आवश्यक असलेली झोपही प्रमाणात आणि योग्य वेळी घेतली गेली पाहिजे. बापूजी भल्या पहाटे उठून आपली काम सुरू करत असत. पहाटे उठून लवकर काम केल्यामुळे माणसाच्या शरीरातली उर्जा टिकून राहते आणि आळस दूर होतो.

३. उपवास- धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर इतर वेळीही उपवास करून पोटाला निरोगी राखता येतं. शरीरात चरबी साठत नाही.

४. चांगलं अन्न- बापूजी म्हणत की, आपलं शरीर ही कचरापेटी नाही. त्यामुळे शरीरात निकृष्ट अन्न जाऊ देऊ नका. खाण्यापूर्वी आपण कोणत्या प्रकारचं आणि दर्जाचं अन्न सेवन करत आहोत, त्याचा शरीरावर काय परिणाम होईल, याचा नीट विचार करा.

५. निर्व्यसनी वृत्ती- दारू आणि सिगरेट हे शरीरासाठी हानिकारक आहेत. फुप्फुसाचे विकार, कर्करोग, स्ट्रोक आणि उच्च रक्तदाब अशांसारखे जीवघेणे आजार त्यांमुळे जडतात.

६. ध्यानधारणा- ध्यान धारणा किंवा मेडिटेशन हा तणावावर उत्तम उपाय आहे. रक्तदाब आणि नैराश्य यांसारख्या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी मेडिटेशन करणं आवश्यक आहे.

७. सकारात्मक विचार- मनात नेहमी सकारात्मक विचार करणं आवश्यक आहे. त्यामुळे सकारात्मक उर्जा उत्पन्न होते आणि शरीरस्वास्थ्यही उत्तम राहतं.

८. पायी चालणं- शरीरात उर्जा निर्माण करण्यासाठी पायी चालणं हा एक उत्तम व्यायाम आहे. शरीरात मेद साठला असेल तर चालण्याच्या व्यायामाने तो कमी होतो. तसंच हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.

९. क्षमा- एखाद्याविषयी कटूता मनात ठेवून त्रास करून घेण्यापेक्षा माफ करायला शिका. माफी मागणं किंवा माफ करणं ही अतिशय साधी कृती आहे. यामुळे आपल्या हृदयावरचा ताण कमी होतो.

१०. सहानुभूती- दुसऱ्याच्या दुःखाकडे सहानुभूतीचा दृष्टिकोन ठेवा. असं केल्यामुळे एखाद्याला समजून घेणं सोपं होतं, तुम्ही एखाद्याचा विनाकारण तिरस्कार करत नाही आणि एखाद्या घटनेची दुसरी बाजूही समजायला लागते.