स्वागताचा कार्यक्रम ठरला निरोपाचा, वकिलानेच बार काऊन्सिलच्या अध्यक्षांना घातल्या गोळ्या

11

सामना ऑनलाईन । आग्रा

उत्तर प्रदेशच्या आग्रा शहरात यूपी बार काऊन्सिलच्या अध्यक्षा दरवेज यादव (38) यांची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली. न्यायालयाच्या परिसरातच आरोपी वकिलाने स्वागत समारंभाच्या कार्यक्रमात त्यांची हत्या केली. आरोपीने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे.

38 वर्षीय दरवेज यांची दोन दिवसांपूर्वी बार काऊंन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यांच्या स्वागतासाठी बुधवारी न्यायालयाच्या परिसरात स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मोठी तयारी करण्यात आली होती. स्वागत समारोहानंतर आरोपी वकिल मनिष शर्माने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दरवेज यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

आग्रा पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, बार काऊंन्सिलच्या अध्यक्ष दरवेज यांच्यावर आरोपीने तीन गोळ्या झाडल्या. या गोळ्या त्यांच्या डोक्यात आणि पोटात शिरल्याने त्यांनी घटनास्थळीच प्राण सोडला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण झाले. तसेच हत्येपूर्वी दरवेज आणि आरोपी मनिष यांच्यात वाद झाल्याचीही माहिती मिळत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या