सर्व्हिस चार्जचा जाब विचारला म्हणून बार वेटरांचा ग्राहकांवर प्राणघातक हल्ला


सामना प्रतिनिधी, ठाणे

तीनशे रुपये सर्व्हिस टॅक्स लावल्याचा जाब विचारणाऱ्या तीन ग्राहकांवर बारच्या कर्मचाऱयांनी बाटल्या फोडून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना मीरा रोडच्या पार्कह्यू हॉटेलमध्ये घडली. इतकेच नव्हे तर वेटर व कर्मचाऱेयांनी काठ्या आणि पट्ट्यांनी त्यांना बेदम मारहाणही केली. याबाबत सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाई केली जाईल, असे मीरा रोड पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

फोटोग्राफी स्टुडिओ चालवणारा संदेश पार्टे हा त्याचे मित्र आनंद काळे आणि प्रशांत वाघमारे यांच्यासोबत लक्ष्मीपार्क परिसरात असलेल्या हॉटेल पार्कव्ह्यू येथे पार्टी करण्यासाठी गेले. या तिघांनी मद्याच्या बाटल्या सोबत आणल्या होत्या. त्या पिण्यास बार व्यवस्थापकाने परवानगी दिली. मद्यपान व जेवण झाल्यानंतर त्यांना बिल देण्यात आले. त्यात 1100 रुपये जीएसटी व 300 रुपये सर्व्हिस चार्ज लावण्यात आला. आनंद काळे याने मॅनेजरला भेटून सर्व्हिस चार्ज का लावला? असे विचारताच त्यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी मॅनेजरने आनंद याला कानाखाली लगावली. त्यानंतर संदेश व प्रशांत याने मॅनेजरला त्याचा जाब विचारताच हॉटेलमधील कामगार, वॉचमन व वेटर असे मिळून 30 जणांनी या तिघांवर बाटल्या फोडून त्याने हल्ला केला. पट्टे, काठय़ा यांनी बेदम मारहाणही केली. याबाबत मीरा रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सर्व्हिस टॅक्सबाबत केंद्र सरकारचे धोरण
2017 मध्ये केंद्र सरकारने सर्व्हिस चार्जबाबत धोरण निश्चित केले आहे. त्यात सर्व्हिस चार्ज हा ऐच्छिक असल्याचे स्पष्ट केले आहे.
हॉटेल किंवा रेस्टॉरंटने सर्व्हिस चार्ज निश्चित करू नये. सर्व्हिस चार्ज किती भरावा हे ग्राहकांवर सोपवावे.
सर्व्हिस चार्जचा कॉलम रिकामा ठेवावा. बिल देताना ग्राहकाने किती सर्व्हिस चार्ज द्यायचा हे स्वतः ठरवावे व तो इच्छा असेल तरच द्यावा.
जर हॉटेल, रेस्टॉरंटने मनमानीपणे सर्व्हिस चार्ज लावला तर त्याविरोधात ग्राहक न्यायालयात ग्राहकाने तक्रार दाखल करावी.