आम्ही सुरक्षित आहोत?

>>भरत जोशी, वन्यजीव अभ्यासक

उद्या कॅनडामध्ये खूप मानाचा समजला जाणारा संगीत महोत्सव होणार आहे. पण ज्या मैदानात कार्यक्रम होणार आहे त्या मैदानात गेल्याच आठवडय़ात दुर्मिळ पक्ष्याचे घरटे आढळले होते. कॅनडाच्या वन्यजीव कायद्यानुसार पक्ष्यांना विशेष संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे या पक्ष्याची शिकार करणं दूरच राहिलं, पण त्याची अंडी सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठीही आयोजकांना सरकारची परवानगी घ्यावी लागणार होती. ही परवानगी मिळेपर्यंत हा संपूर्ण परिसर बंद करण्यात आला होता. येथे २४ तास सुरक्षारक्षक तैनात आहेत. यातील चार अंडय़ांपैकी ३ अंडय़ांतून पिलं बाहेर आली आहेत. १ पिलू बाहेर यायचं आहे. त्यामुळे हा संगीत महोत्सव ठरलेल्या दिवशी होईल की नाही ही शंका आहे. ज्या पद्धतीने बाहेरील देशात पशुपक्ष्यांना कडक कायद्याचे संरक्षण आहे. त्याप्रमाणे आपल्याकडे ते किती आहे आणि त्यावर किती प्रामाणिकपणे अंमल केला जातो याविषयी शंकाच आहे.

मनुष्यप्राणी हा आपल्या स्वतःच्या स्वार्थापोटी निसर्गावर, जंगलावर तसेच पर्यावरणावर सतत अतिक्रमण करीत असतो. त्या हव्यासापोटी हा स्वार्थी मनुष्यप्राणी स्वतःची घरे उभारताना निसर्गातील इतर पक्षी-प्राणी यांचा कधी विचारच करत नाही. प्रचंड प्रमाणात होणाऱ्या जंगलतोडीमुळे बिचाऱ्या वन्यजीवांनी घरटी बांधण्याची निवासस्थानेच प्रचंड प्रमाणात उद्ध्वस्त करीत असतो. रस्ता रंदीकरण, मोनो रेल, मेट्रो रेल, सुधारणा इत्यादी कित्येक गोंडस नावाखाली प्रचंड प्रमाणात तो निसर्गाची, जंगलाची प्रचंड मोठय़ा प्रमाणात हानी करीत असतो आणि मग हे पक्षी-प्राणी अनाथ आणि निर्वासित होतात.

मग हा टप्पा झाला की हा मनुष्यप्राणी पक्षी-प्राण्यांची असंख्य प्रमाणात स्वार्थापोटी शिकार करून हत्या करीत असतो. शेतामध्ये मोठमोठय़ा जाळय़ा बांधून शेकडो बुलबुल पक्षी, पोपट यांना जाळय़ांमध्ये अडकवून त्यांना पकडून या पक्ष्यांची प्रचंड मोठय़ा प्रमाणात मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट, पुण्यातील वेगवेगळय़ा मंडईत या पक्ष्यांना पिंजऱ्यात डांबवून त्यांचे पंख कात्रीने अर्धवट कापून त्यांची मग सुंदर, नाजूक, देखण्या पिंजऱ्यासकट विक्री केली जाते. त्याचप्रमाणे शेताभोवती विजेच्या प्रवाहाच्या तारा लावल्या जातात आणि त्यात असंख्य तिवटे, कोल्हे, रानमांजर, रानडुकरे, पाणकोंबडय़ा, सर्प त्या तारांचा स्पर्श झाला की तडफडून मृत्युमुखी पडतात. या आणि अशा प्रकारच्या होणाऱ्या हत्या, अवैध शिकार तसेच काळविटांची शिकार या सर्वांमुळे हिंदुस्थान सरकारच्या वन विभागाने १९७२ वन्यजीव संरक्षणाच्या सुधारित कायद्याची अंमलबजावणी करायला तसेच चित्रपटसृष्टीतील होणाऱ्या वन्यजीवांचे होणारे हाल, त्यांच्याकडून मारून मुटकून करून घ्यावयाचे रोल या सर्वात कायद्याने लक्ष्मणरेखा आखली. वन्यजीव संरक्षण कायदा १९९२ च्या सुधारित कायद्यातील कलमानुसार सर्कशीमधील ‘या’ वन्यजीवांचे इलेक्ट्रिक शॉक आणि चाबकाचे फटके घेऊन सर्कशीतील खेळ थांबवले गेले ते या वन्यजीव संरक्षण कायद्यामुळेच.

कायद्याचा बडगा

पक्षी-प्राण्यांचे संरक्षण व्हावे या उद्देशाने तयार केलेल्या भारत १९७२च्या कायद्यात कालामानानुसार सुधारणा करण्यात आली आणि त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याविषयीचा (जी.आर.) सरकारी अध्यादेश सर्व पोलीस, वन विभाग, कस्टम्स, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात येऊन त्याविषयीच्या गुन्हय़ात त्वरित कारवाई करण्याचे आदेश पारीत करण्यात आलेले आहेत. या संरक्षित कायद्यामुळे वन्यजीव सुरक्षित झाला आहे आणि अशा प्रकारच्या कायदय़ाच्या सुरक्षित कवचामुळे वन्यजीव काही प्रमाणात सुरक्षित झाले आहेत. आपल्याला अशाप्रकारच्या कायद्याचा उल्लंघन करणाऱ्या घटना आढळल्यास वन विभाग हेल्पलाइन दू. क्र. ०२२-२५४३४३४९, फॉरेस्ट कंट्रोल रूम दू.क्र. ०२२-२५४४५४५९ किंवा वन्यजीव अभ्यासक भरत जोशी हेल्पलाइन ९२२१५८१८८८ वर त्वरित संपर्क साधावा.

कायद्याचे फायदे

> पक्षी-प्राणी यांना मारण्याचे प्रमाण १० टक्क्यांवर आहे.

> नागपंचमीच्या दिवशी गारूडी, मदारी टोपलीत नाग घेऊन येण्याचे प्रमाण शून्य टक्के.

> माकड, अस्वलांचे खेळ बंद झाले.

> सर्कशीतील वन्यजीवांच्या खेळास बंदी.

> शहराशहरातून हत्तींना फिरवून त्यावर उपजीविका करणाऱ्या माहुतांवर बंदी.

> नाग, धामण, अजगर, सर्पाच्या तस्करीवर बंदी.