लेख : देशात आज असंतोष का आहे?

>>बसवेश्वर चेणगे<<

सर्वसामान्य जनतेला सरकार कोणाचेही आले तरी फरक पडत नसतो, परंतु या सरकारने आपले जगणे सुसह्य करावे, आपल्याला आवश्यक सोयीसुविधा द्याव्यात, प्रगती व्हावी अशा माफक अपेक्षा असतात, पण त्याही पलीकडे जाऊन जर नागरिकांना प्रत्येक बाबीमध्ये त्रासच होणार असेल तर नक्कीच जनतेचा कधी ना कधी उद्रेक होतोच हेही लक्षात घेणे गरजेचे आहे. शेवटी सत्ता कोणाचीही असली तरी लोकशाहीची मूल्ये पाळणाऱ्यांची सत्ता येऊन सुखाचे दोन घास आनंदाने खाता यावेत अशी परिस्थिती निर्माण व्हावी असेच प्रत्येक नागरिकाला वाटत आहे.

संसद, प्रशासन, न्याय व्यवस्था आणि पत्रकारिता हे हिंदुस्थानी लोकशाहीचे चार प्रमुख स्तंभ आहेत,  या शक्तिस्थळांमुळेच आपली लोकशाही जगात सर्वश्रेष्ठ ठरली आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या राज्यघटनेने हक्क व अधिकार दिले आहेत, पण आज लोकशाहीच्या या प्रत्येक स्तंभाला हादरे बसू लागले आहेत. देशातील एकूणच वातावरण या हादऱ्यांमुळे अस्वस्थ बनलेले दिसून येत असून देशातील प्रत्येक नागरिक आपल्या देशातील या बदललेल्या वातावरणामुळे अस्वस्थ व चिंताग्रस्त झालेला दिसून येत आहे.

दहा वर्षांपूर्वीची सामाजिक स्थिती आणि आजची सामाजिक स्थिती यामध्ये आपल्याला काही बदल जाणवतो का? असा प्रश्न आपण प्रत्येकाने आपल्या मनाला विचारला, तर त्याचे उत्तर निश्चितपणे बदल जाणवतो असेच येईल. मग हे बदल काय आहेत याचा आपण विचार केला पाहिजे. समाजात होत गेलेले बदल किंवा सध्या होत असलेले बदल हे केवळ सामाजिक क्षेत्रात होत नाहीत, तर ते राजकीय क्षेत्रातही होत आहेत. त्याचे पडसाद सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रावर पडत आहेत.

गेली साठ वर्षे काँग्रेसने सत्ता भोगली आता भाजपचे सरकार केंद्रात आले. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनात काय बदल झाला? हा खरा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आपला देश अखंड आहे. येथे अनेक जातीधर्माचे लोक राहतात. त्यांच्या भाषा वेगळ्या आहेत. त्यांची वेशभूषा, त्यांच्या चालीरीती वेगळ्या आहेत आणि म्हणूनच आपला देश हा विविधरंगी असला तरी हिंदुस्थानी म्हणून आपण सारे एक आहोत. समाज म्हणून, व्यक्ती म्हणून आपण ज्यावेळी जगतो त्यावेळी प्रत्येकाला आपला परिसर, गाव, देश सर्वार्थाने प्रगतिपथावर जावे असे वाटत असते, समाजात शांतता नांदावी असेही वाटत असते, परंतु तसे होत नाही. काही वेळा मुद्दाम भांडणे लावली जातात तर काही वेळा ती प्रत्यक्ष लागत असतात आणि त्याचा लाभ कुणीतरी उठवत असतो. सध्या राजकीय पातळीवर तसेच चालले आहे. काँग्रेसने देशासाठी काय केले असे भाजपने म्हणायचे आणि दुसरीकडे भाजपने देशासाठी काय केले असे काँग्रेसने म्हणायचे, पण त्यामुळे दोघेही चांगले आहेत आणि दोघेही वाईट आहेत असे म्हणता येणार नाही. दोन्ही पक्षांनी देशाच्या विकासासाठी आपापल्यापरीने योगदान दिलेले आहेच, पण त्यांच्यातील या श्रेयवादाच्या भांडणामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे हे पक्ष कितीसे लक्ष देतात हाही विचार करण्यासारखा मुद्दा आहे. निवडणुका आल्या की, घोषणांचा पाऊस पाडायचा आणि प्रत्यक्षात तळागाळातील लोकांपर्यंत काय पोहोचतं तो मुद्दा वेगळाच असतो.

गेल्या चार वर्षांतील एकूणच राजकारणाचा राज्यातील जनतेवर काय परिणाम झाला याबाबत विचार केला तर आपल्या असे लक्षात येईल की, देशामध्ये एक विचारधारा सर्वसामान्य माणसांच्या विचार स्वातंत्र्यावर, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर एक धाक निर्माण करू पाहते आहे. त्यामुळे राज्यघटनेने बहाल केलेल्या स्वातंत्र्यावर मर्यादा येऊ लागल्या आहेत की काय अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. सर्वसामान्यांच्या मनामध्ये ही खदखद असली तरी तो आज कोणत्या तरी दडपणाखाली असल्याने बोलू शकत नाही इतकेच.

व्हॉटस् ऍप, फेसबुकच्या माध्यमातून सातत्याने सरकारकडून व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणू पाहणाऱ्या बातम्या प्रसारित होत आहेत. या बातम्या सरकारकडून अधिकृतरीत्या प्रसारित होत आहेत की अन्य कोणी या बातम्या हेतुपुरस्सर पसरवून समाजातील वातावरण गढूळ करीत आहे याबाबतही सरकारने खुलेपणाने जनतेला माहिती दिली पाहिजे. मध्यंतरी अशी एक बातमी प्रसारित झाली की, सरकार नागरिकांच्या प्रत्येक बारीकसारीक हालचालीवर लक्ष ठेवणार आहे आणि त्यासाठी गाव, वॉर्ड पातळीवर माणसे नेमली आहेत. अशा प्रकारच्या बातम्यांमुळे समाजातील सर्वसामान्य माणसांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. व्होटिंग मशीनद्वारे निवडणुका घेण्याच्या सदोष पद्धतीमुळेही समाजात शंकेचे वातावरण आहे.

या व अशा अनेक बाबींमुळे सध्या जनतेमध्ये एक असंतोषाचे वातावरण आहे. केंद्रातील भाजप सरकारने केलेली नोटाबंदी, त्यानंतर देशाच्या विकास दरामध्ये झालेली घसरण, त्यापाठोपाठ जीएसटी करप्रणाली, कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकांवेळी भाजपने घेतलेली भूमिका या सर्व बाबींमुळे देशातील सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये सरकारच्या हेतूबद्दल शंका निर्माण होईल असे वातावरण तयार झाले आहे.

सर्वसामान्य जनतेला सरकार कोणाचेही आले तरी फरक पडत नसतो, परंतु या सरकारने आपले जगणे सुसह्य करावे, आपल्याला आवश्यक सोयीसुविधा द्याव्यात, प्रगती व्हावी अशा माफक अपेक्षा असतात, पण त्याही पलीकडे जाऊन जर नागरिकांना प्रत्येक बाबीमध्ये त्रासच होणार असेल तर नक्कीच जनतेचा कधी ना कधी उद्रेक होतोच हेही लक्षात घेणे गरजेचे आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्यास भाजपला आव्हान उभे राहू शकते. शेवटी सत्ता कोणाचीही असली तरी लोकशाहीची मूल्ये पाळणाऱ्यांची सत्ता येऊन सुखाचे दोन घास आनंदाने खाता यावेत अशी परिस्थिती निर्माण व्हावी असेच प्रत्येक नागरिकाला वाटत आहे.