सरकार सांगणार तेच होणार ! बीसीसीआयने निर्णयाचा चेंडू केंद्राकडे टोलावला

bcci-logo

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली 

आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या नियमांपेक्षा आमचे देशहित मोठे आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 40 हिंदुस्थानी जवान शहीद झालेले आहेत. या हल्ल्याला छुपा पाठिंबा देणार्‍या पाकिस्तानशी टीम इंडियाने येत्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत खेळावे की नाही याचा निर्णय आता केंद्र सरकारच घेईल. आम्ही सरकारच्या आदेशाशी बांधील आहोत. केंद्राने परवानगी दिली तरच पाकिस्तानशी खेळू अन्यथा नाही, असा ठाम निर्णय हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासकीय समितीने आज खास बैठकीत घेतला.  

केंद्रीय क्रीडा, गृह आणि संरक्षण मंत्रालयाशी बोलूनच बीसीसीआय इंग्लंडमधील विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध खेळावे की नाही याबाबतचा निर्णय घेईल. देशहित आणि जनतेच्या भावनांचा अपमान करून आम्ही कोणताही निर्णय घेणार नाही. – विनोद राय, बीसीसीआय प्रशासकीय समिती प्रमुख

भविष्यात दहशतवादाला खतपाणी घालणार्‍या पाकिस्तानशी क्रीडा संबंध कसे ठेवावेत ही बीसीसीआयला वाटणारी चिंता आम्ही आयसीसीला पत्र लिहून कळवणार आहोत असे सांगून प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय म्हणाले, विश्वचषक स्पर्धेला अद्याप तीन महिने उरले आहेत. तोपर्यंत होणार्‍या घडामोडीनंतर बीसीसीआय या स्पर्धेतील सहभाग आणि पाकिस्तानशी खेळण्याबाबतचे धोरण जाहीर करेल. आम्हाला वाटणारी चिंता व देशवासीयांच्या तीव्र भावनांची माहिती आम्ही प्रत्यक्ष चर्चेद्वारेही आयसीसीला देणार आहोत. दहशतवाद पोसणार्‍या देशाविरुद्ध खेळायचे की नाही तेही आम्हाला भविष्यात ठरवायचे आहे.

आयपीएल उद्घाटन सोहळा रद्द करून शहीदांच्या कुटुंबीयांना मदत करणार

आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा रंगारंग उद्घाटन सोहळा रद्द करून बीसीसीआय त्यासाठी खर्च होणारी रक्कम पुलवामाच्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांना देण्याचा निर्णयही बीसीसीआयने आजच्या बैठकीत घेण्यात आला. पुलवामा हल्ल्यानंतर इंग्लंडमधील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या लढतीवर टीम इंडियाने बहिष्कार घालावा अशी मागणी आता देशभरात जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर बीसीसीआय प्रशासक समितीची खास बैठक आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सदस्या डायना एडल्जी तसेच तिसरे सदस्य निवृत्त लेफ्टनंट जनरल रवींद्र थोडगे हे सहभागी होते.

हिंदुस्थानी क्रिकेट संघाने विश्वचषकात पाकिस्तानला नेहमीच चारीमुंड्या चीत केले आहे. आता आपण यंदा त्यांच्याविरुद्ध खेळलो नाही तर आपलाच दोन गुणांचा तोटा होणार आहे. पण शेवटी देशापेक्षा काहीच मोठे नाही आणि माझा देश व देशवासी यासंदर्भात जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल. – सचिन तेंडुलकर  

पाकिस्तानशी न खेळण्याचा हिंदुस्थानला पूर्ण अधिकार!

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहत हिंदुस्थानला पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट न खेळण्याचा पूर्णपणे अधिकार असल्याचे म्हटले आहे. हिंदुस्थानी सैन्यावर दहशतवादी हल्ला झाला असून त्यात त्यांच्या जवानांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे हिंदुस्थानने पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेतला तर त्यात वावगे काहीच नाही, असे अख्तर म्हणाला. तो एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीशी बोलत होता. मात्र आपल्या मतप्रदर्शनात शोएबने पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर टीका करणार्‍या माजी हिंदुस्थानी क्रिकेटपटूंना आपल्या टीकेचे लक्ष्य बनवले आहे. हिंदुस्थानी खेळाडू प्रकरणाचे गांभीर्य लक्षात न घेता टीका करत असल्याचे शोएबने म्हटले आहे. हिंदुस्थानी जवानांना आपले प्राण गमवावे लागले याबद्दल आम्हाला दुःख आहे. मात्र पाकिस्तान हा एक स्वतंत्र देश आहे. त्यामुळे मनात कोणताही दुसरा विचार न आणता आम्ही पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाठीशी आहोत असे अख्तर म्हणाला.