बीसीसीआयकडून पाक क्रिकेट मंडळाची कोंडी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील राजनैतिक तणाव तसेच बीसीसीआयला कोर्टात खेचण्याचा पाकिस्तान क्रिकेट बोर्डचा निर्णय पाकिस्तानला अंगलट येताना दिसतोय. पाकिस्तानात एप्रिल महिन्यात खेळवण्यात येणाऱ्या एशिया इमर्जिंग नेशन्स स्पर्धेसाठी बीसीसीआयने आपला संघ पाठविण्यास नकार दिल्यामुळे पाकिस्तान अडचणीत आलाय.

बीसीसीआयने आपला संघ पाठवला नाही तर स्पर्धा श्रीलंका किंवा बांगलादेशला हलवण्यात येईल. त्यामुळे पाकिस्तानी बोर्ड चांगलाच अडचणीच सापडला आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने २०१७ साली एशिया इमर्जिंग नेशन्स कप स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला दिले होते, मात्र यजमानपदाबाबत आपले मत विचारात न घेतल्याने आपण या स्पर्धेत संघ पाठवणार नसल्याची भूमिका बीसीसीआयने घेतली आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजीम सेठी यांनी दुबईमध्ये माध्यमांना सांगितले, यजमानपदाकरून उद्भवलेली कोंडी फोडण्यासाठी आशिया क्रिकेट कौन्सिलचा अध्यक्ष या नात्याने मी कोलंबोत विशेष बैठक बोलावली आहे. तसेच हिंदुस्थानात होणाऱ्या आगामी आशिया चषक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आमच्याही काही अटी आहेत. या अटींची पूर्तता न झाल्यास पाकिस्तानही हिंदुस्थानात होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत सहभागी होण्याबाबत विचार करेल. एप्रिल महिन्यात कोलकाता येथे आयसीसीची विशेष बैठक होणार असून या बैठकीला हजर राहण्यास आपल्याला अजिबात स्वारस्य नाही, असेही नजीम सेठी यांनी सांगितले.