प्रामाणिक शिक्षक साकारायला मिळाला – संजय खापरे

शिक्षक हा विद्यार्थ्यांसाठी देव असतो. पण चित्रपटांमध्ये विद्यार्थ्यांना वाटणारा देवासारखा शिक्षक फारसा दिसलेला नाही. ‘बे एके बे’ या सिनेमात मला तशाच देवासारख्या शिक्षकाची भूमिका करायला मिळाली. हा माधव गुरुजी खूपच वेगळा वाटला म्हणून मी लगेच ही भूमिका स्वीकारली, अशा शब्दात अभिनेता संजय खापरे याने आपले मत व्यक्त केले. बुधवारी मुंबईत या सिनेमातील ध्वनिमुद्रिकांचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी तो बोलत होता. यावेळी या सिनेमाचे निर्माते विकास भगेरीया, हेमा फाऊंडेशनचे महेंद्र काबरा, अनिता महेश्वरी, सहनिर्माते प्रविण गरजे, झी म्युझिकचे आदित्य निकम, दिग्दर्शक संचित यादव यांच्यासह सिनेमातील सर्व कलावंतही उपस्थित होते.

या सिनेमाची निर्मिती विकास भगेरीया आणि पूर्णिमा वाव्हळ-यादव यांनी थ्री स्टार एंटरटेनमेंट आणि नमस्ते एंटरटेनमेंट फिल्म्स या बॅनरखाली केली आहे. यात जयवंत वाडकर, संचित यादव, पूर्णिमा वाव्हळ-यादव, संतोष आंब्रे, अतुल मर्चंडे आणि अरूण नलावडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अभिजीत कुलकर्णी संवादलेखन, कला दिग्दर्शन देवेंद्र तावडे, नृत्य दिग्दर्शन संतोश आंब्रे, छायांकन अतुल जगदाळे यांनी केले आहे.