विमानाच्या आवाजाने रात्रभर झोपलोच नाही

28 जून मुंबईतील घाटकोपरमध्ये विमान कोसळले, वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू

सामना प्रतिनिधी । मुंबई

घाटकोपरच्या जीवदया लेन येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या आवारात गुरुवारी दुपारी १२ आसनी चार्टर्ड विमान कोसळले. त्यावेळी झालेला प्रचंड मोठा आवाज आणि आगीचे लोळ, एकामागोमाग झालेले चार ते पाच स्फोट, वैमानिक, तंत्रज्ञ आणि एका पादचाऱयाचा आमच्या डोळय़ांदेखत जळणारे मृतदेह… हे सारे आठवले की आमच्या काळजाचा अक्षरश: थरकाप उडतो. या घटनेनंतर विमानाच्या आवाजाने रात्रभर झोपच लागली नाही. दर दीड ते दोन मिनीटांनी डोक्यावरून विमान गेल्यानंतर आमच्या काळजाचा ठोका चुकतो… अशा शब्दांत घाटकोपरच्या जीवदया लेनमधील रहिवाशांनी विमान दुर्घटनेनंतर झालेली मानसिक अवस्था कथन केली. यावरून या भीषण दुर्घटनेची प्रचंड दहशत या रहिवाशांच्या मनामध्ये असल्याचेच उघड झाले.

ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या ठिकाणाच्या आजूबाजूला दाट लोकवस्ती असून तेथील इमारतींमधील अनेक रहिवाशांनी ही दुर्घटना याचि देही याचि डोळा पाहिली. अनेकजण खिडकीत बसलेले असताना अचानक कर्णकर्कश आवाज करत एक विमान केबलच्या तारा कापत डोळय़ांसमोरून झर्रकन गेले आणि काही कळायच्या आत जमिनीवर कोसळले. त्यावेळी प्रचंड मोठा आवाज झाला. त्यानंतर आगीचे लोळच्या लोळ बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या दुसऱ्या -तिसऱ्या मजल्यापर्यंत गेले. विमान आणि आपली इमारत यांच्यात काही फुटांचेच अंतर होते. विमान जरा इकडे किंवा तिकडे झाले असते तर आमची इमारत पत्त्यासारखी कोसळली असती आणि शेकडो लोक मृत्युमुखी पडले असते असे जैन शिवम बिल्डिंगमधील रहिवाशांनी सांगितले.

मेट्रो-विमानाची टक्कर झाली असती तर…

घटनास्थळापासून थोडय़ाच अंतरावर मेट्रोचे विवो घाटकोपर आणि जागृतीनगर ही दोन स्थानके आहेत. या दोन स्थानकांमधून दर तीन ते चार मिनिटाला मेट्रो ट्रेन जाते. हे विमान मेट्रोला जाऊन धडकले असते तर हजारो लोकांचे नाहक बळी गेले असते.

कडक पोलीस बंदोबस्त आणि बघ्यांची गर्दी

गुरुवारी दुपारी ही विमान दुर्घटना घडली त्यावेळी विमानाची काही अवशेष या ठिकाणी दिसत होते. परंतु दुसऱ्या दिवशी या ठिकाणी केवळ राखच दिसत होती. चारही बाजूला पडदे लावण्यात आले असून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दुसऱया दिवशीही दुर्घटनास्थळाच्या आजूबाजूला बघ्यांची गर्दी दिसत होती.

धुरामुळे श्वास कोंडला

एकामागोमाग एक स्फोट होत गेल्यानंतर विमानातून आगीचे प्रचंड लोळ उडाले. त्याचबरोबर धुराचेही लोट निघाले. सगळीकडे धूरच धूर झाला. श्वासही घेणे कठीण झाले. त्यामुळे रहिवाशांनी दारे -खिडक्या बंद करून घेतल्याचे रहिवाशांनी सांगितले. दुर्घटनास्थळाजवळ असणाऱ्या आमची तर खिडकी उघडण्याची हिंमतही होत नव्हती असेही एका रहिवाशाने सांगितले.