लेटलतिफ रेल्वे कर्मचाऱ्यांची आता खैर नाही

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

कामावर उशिरा येऊन घरी लवकर पळणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांची आता काही खैर नाही. कारण रेल्वेच्या सर्वच कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक अटेंडंस मशीन बसवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाला घेतला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीपासून रेल्वे या निर्णयाची अंमलबजावणी करणार आहे.

रेल्वेमध्ये कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असून बरेच जण कामावर उशिरा येऊन घरी लवकर जातात. यात कर्मचाऱ्यांबरोबरच अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. याचा कामावर परिणाम होत असल्याच्या अनेक तक्रारी रेल्वे प्रशासनाला मिळाल्या. यामुळे या बेशिस्त कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी बायोमेट्रिक अटेंडंस मशीन लावण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. सध्या रेल्वे बोर्ड, विभागीय मुख्यालय व त्याच्याशी संबंधित कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक अटेंडंस मशीनची सुविधा आहे. पण जानेवारीपासून रेल्वेच्या सर्वच कार्यालयांमध्ये हे मशीन बसवण्यात येणार असल्याची महिती एका ज्येष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने दिली आहे.