बीडमध्ये मटनातून 60 जणांना झाली विषबाधा

8

सामना प्रतिनिधी। बीड

बीड मधील धानोरा रोड भागात कंदुरीच्या कार्यक्रमात मटण व इतर पदार्थ खाल्ल्याने जवळपास 50 ते 60 लोकांना विषबाधा झाली. ही घटना मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास घडली आहे. दरम्यान, सर्व रुग्णांवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

धानोरा रोड भागात जागरण गोंधळानिमित्त मंगळवारी रात्री कंदुरीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पाहुण्यांसाठी खास मटन व इतर पदार्थांची रेलचेल होती. रात्री उशीरा जेवणे सुरू झाली. मात्र जेवल्यानंतर 50 जणांना उलट्या तर काहींना मळमळू लागले. यामुळे त्यांना बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यात  14 लहान मुलांचा समावेश आहे.

सदरील घटनेची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागास देण्यात आली. सहाय्य आयुक्त कृष्णा दाभाडे, अन्न सुरक्षा अधिकारी ऋषिकेश मरेवार, अनिकेत भिसे व इतर कर्मचारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. सर्वाना अन्नातून विषबाधा झाल्याचे डॉक्टरांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर कंदुरीसाठी बनविलेला मटणाचा रस्सा, भात, वांग्याची भाजी, बाजरीच्या भाकरीचे सॅम्पल घेण्यात आले.

यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी ऋषिकेश मरेवार यांनी सांगितले आहे की, नॉनव्हेज खाल्ल्याने विषबाधा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले असून सॅम्पल तपासणीसाठी घेतले आहेत. तर पंचनामा करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या