बीड: ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात, 4 ठार

2

सामना ऑनलाईन । बीड

माजलगाव-परभणी या राज्य महामार्गावर पवारवाडीजवळ झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागेवरच मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पवारवाडीजवळील गॅस गोडाऊनसमोर हा अपघात झाला. या अपघातात एक गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार माजलगाव तालुक्यातील सावरगाव येथील छत्रपती साखर कारखान्यातून साखरेचे पोते भरलेला ट्रक दुपारी 12 वाजून 35 मिनिटांला निघाला. पवारवाडीजवळील गॅस गोडाऊनसमोर ट्रक रस्त्यावर पलटी झाला. समोरून येणारे दोन मोटरसायकल ट्रकआ णि साखरेच्या पोत्यांखाली दबल्या गेल्या. यात एकाच कुटुंबातील चौघांचा जागेवरच मृत्यू झाला तर एक जखमी झाला आहे. त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.

सोळंके कुटुंबावर काळाचा घाला..

माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथील सोळंके कुटुंबातील चौघांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. दयानंद गणेश सोळंके (48), संगीता दयानंद सोळंके (42), राजनंदनी दयानंद सोळंके (12), प्रतिक दयानंद सोळंके(9) असे मृतांची नावे आहेत. बब्बू असे जखमी तरुणाचे नाव आहे.

गणरायाच्या दर्शनाला गेले होते सोळंके कुटुंब..

दयानंद सोळंके हे एचडीएफसी बॅंकेत सुरक्षा अधिकारी होते. गंगामसला येथील गणरायाच्या ते दर्शनासाठी सहकुटुंब गेले होते. गणरायाचे दर्शन घेऊन ते परतत असताना हा भीषण अपघात झाला.