बीडमध्ये उपोषणकर्त्या नगरसेवकांची प्रकृती खालावली; उपोषणाचा तिसरा दिवस

1
beed-drainge-system

सामना प्रतिनिधी । बीड

बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक बेमुदत उपोषणाला बसले आहेत. शुक्रवारी उपोषणाचा तिसरा दिवस आहे. त्यामुळे काही नगरसेवकांची प्रकृती खालावली आहे. आता प्रशासनाने सहनशीलतेचा अंत पाहू नये, असा इशारा देण्यात आला आहे. बीड शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या व स्वच्छतेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा असलेल्या 154 कोटी रूपयांच्या भुयारी गटार योजनेत जाणीवपूर्वक दिरंगाई करत नगर परिषदेच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी चिरीमिरीसाठी ठेकेदाराला वेठीस धरून योजनेच्या कामास आडकाठी केल्यामुळे नगरसेवक उपोषणाला बसले आहेत.

बीड शहरासाठी असलेल्या भुयारी गटार योजनेत चमकोगिरी करण्यासाठी उद्घाटन करण्याचा घाट नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर घालत आहेत. त्यांच्या बोटावर पालिका प्रशासन नाचत आहे. सहा महिन्यांपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता भांबरे यांनी 154 कोटी 94 लाख 15 हजार 347 रूपयांच्या योजनेच्या कामाला सुरुवात करण्याचे आदेश काम करणाऱ्या एजन्सीने इंद्रायणी कन्सस्ट्रक्शन यांना दिले आहेत. सहा महिने उलटूनही अद्याप भुयारी गटाच्या योजनेचे काम सुरू झालेले नाही. काम सुरू करण्याकरीता इंद्रायणी कन्सस्ट्रक्शन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठपुरावा करत आहे. ठेकेदाराने जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अयिभंता भांबरे यांच्यातर्फे मुख्याधिऱ्यांना पत्रही पाठवले. केवळ नगराध्यक्षांच्या शपथ पत्रावरील सहीमुळे काम ठप्प झाले आहे. त्यांना कामाचे उद्घाटन करायचे आहे. हट्टासाठी त्यांनी शहराला वेठीस धरले जात आहे. शहरात असवच्छता पसरली आहे. साथीच्या आजाराने जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. याचे भानही सत्ताधाऱ्याना राहिले नाही.

भुयारी गटाचे काम तातडीने सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली गटनेते फारूक पटेल, नगरसेवक अमर नाईकवाडे, भैय्यासाहेब मोरे, रंजित बनसोडे, प्रभाकर पोपळे, शेख आमेर, बिभीषण लांडगे आदी नगरसेवक बेमुदत उपोषणाला बसले आहेत. शुक्रवारी उपोषणाचा तिसरा दिवस असून उपोषणकर्त्याची प्रकृती खालावत आहे.