बीड जिल्हा बँक दुपार पर्यंत झोपलेलीच

सामना प्रतिनिधी । बीड

बीड जिल्हा बँकेचा कारभार कसा चालतो हे समोर आले आहे. या बँकेवर ना वरीष्ठांचे नियंत्रण ना पदाधिकाऱ्यांचा धाक आहे. शनिवारी दुपारचे बारा वाजले तरी बँकेचे शटर बंदच आणि बँकेबाहेर ग्राहकांची रांगच रांग होती. ग्रामीण भागातील शेतकरी रणरणत्या उन्हात बँक उघडण्याच्या प्रतिक्षेत होते. हा प्रकार शनिवारी दिंदृड शाखेत घडला.

भ्रष्टाचार आणि घोटाळ्याच्या दलदलीत फसलेल्या बीड जिल्हा बँकेला पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी संचालकांकडून कोणतीही उपाय योजना नाही. बँकेत प्रचंड सावळा गोंधळ आहे. कुणाचा पायपोस कुणातच नाही. अधिकाऱ्यांचे कोणी ऐकत नाही. पदाधिकाऱ्याचा धाक नाही. बँकेत प्रत्येकाची मनमानी. या गोंधळात हाल मात्र सामान्य नागरिकांचे होत आहेत. जनतेच्या ठेवी अजूनही परत दिल्या जात नाहीत. व्यवहार सुरळीत नाही. बोन्ड अळीचे पेमेंट जमा नाही. याला कारणीभूत बँकेचा गचाळ कारभार आहे. अशा परिस्थितीत खातेदारांना बँकेवर अवलंबून राहावे लागत आहे. जिल्हा बँकेच्या दिंदृड शाखेत सकाळी साडेदहा वाजल्या पासून अपंग, वयोवृद्धांनी रांग लावली. दुपारचे बारा वाजले तरी बँकेची दारे बंदच, दुपार झाली तरी बँक झोपलेलीच याचा फटका सामान्य जनतेला सहन करावा लागला.