प्रधानमंत्री पीक विमा योजनेत बीड जिल्हा देशात प्रथम

सामना प्रतिनिधी । बीड

शेतकऱ्यांचा पिक विमा भरुन घेण्यात देशभरात सर्वात चांगली कामगिरी करुन बीडच्या प्रशासनाने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. बीडच्या प्रशासनाची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली असून शनिवारी दिल्लीत जिल्हाधिकारी एम.डी.सिंह आणि जिल्हा कृषी अधिकारी एम.एल.चपळे यांचा सन्मान स्वत: मोदी करणार आहेत. या स्पर्धेत देशातील तीन जिल्ह्यांची निवड करण्यात आल होती. यामध्ये बीड, नांदेड आणि तामिळनाडू येथील शिवगंगा जिल्ह्याचा सामवेश होता.

२०१६-१७ मध्ये सार्वधिक विमा बीड जिल्ह्याने भरला होता आणि त्याचा लाभही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झाला होता. २०१६-१७ या वर्षी खरीपात जिल्ह्यातून ५५ कोटी ४६ लाख विमा रक्कम भरण्यात आला होता त्याबदल्यात तब्बल २३३ कोटी ८४ लाख रुपये असा भरघोस निधी जिल्ह्याच्या पदरात पडला होता. तर २०१७-१८ च्या खरीप हंगामात ६३ कोटी ७१ लाख तर रब्बी हंगामात ८ कोटी ४४ लाख रकमेचा विमा भरण्यात आला होता. या कामगिरीमुळे जिल्ह्याचा गौरव केला जाणार आहे. केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी योजनेमध्ये बीड जिल्ह्याने केलेली कामगिरी उत्कृष्ट आहे. २०१६-१७ मध्ये पिक विमा रक्कम भरुन घेण्यासाठी कृषी सहाय्यकापासून, क्षेत्रीय कर्मचारी, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी ते जिल्हा कृषी अधिकारी अधिक्षकापर्यंच्या अधिकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिक विम्याचे महत्व, बँकेत येणारे अडथळे, विमा रक्कम भरुन घेण्यासाठी रात्र-रात्र बँक चालू ठेवणे तसेच विमा भरण्यासाठी रांगेत उभे असलेल्या शेतकऱ्यांना अल्प उपहाराची सोय करण्यात आली होती. पुरस्कारासाठी या सर्व बाबी महत्त्वाच्या ठरल्या असून यामुळे जिल्ह्याची मान देशात उंचावणार आहे. आज दिल्ली येथील विज्ञान भवन येथे हा सोहळा पार पडणार आहे. याकरिता जिल्हाधिकारी एम.डी.सिंह आणि जिल्हा कृषी अधिक्षक एम.एल.चपळे हे दिल्लीकडे रवाना झाले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान
पिक विमा भरण्याच्या मुदतीपासून अखेरपर्यंत ही मोहीम जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अधिकचा विमा भरुन घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी बैठका घेतल्या होत्या. त्यांच्या आदेशानुसारच या काळात रविवारीही बँका सरु ठेवण्यात आल्या होत्या. महसूल कर्मचाऱ्यांसह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सुचनांचे पालन झाल्यानेच ही मोहीम जिल्ह्यात यशस्वी झाली होती.