Lok sabha 2019 बीड : प्रीतम मुंडेंना राष्ट्रवादीचे अमरसिंह देणार शह

उदय जोशी । बीड

संपूर्ण राज्याचे लक्ष असणाऱ्या बीड जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीसाठी चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपाकडून विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे तर पारंपारिक विरोधक असणाऱ्या राष्ट्रवादीकडून माजी आमदार अमरसिंह पंडित या बलाढ्य उमेदवाराच्या नावावर एकमत झाले आहे. बीड जिल्ह्यातील लोकसभा निवडणुक खऱ्या अर्थाने दुरंगी होणार आहे आणि निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष राहाणार आहे. भाजपाची कमान पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हातात तर राष्ट्रवादीची धुरा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हातात असणार आहे. अमरसिंह पंडितांसारखा तगडा उमेदवार मैदानात उतरत असल्याने भाजपाला मोठी ताकद वापरावी लागणार आहे.

राजकारणामध्ये धक्कातंत्राचा वापर नेहमीच बीड जिल्ह्यामध्ये केला जातो आणि या धक्कातंत्राची तिव्रता मुंबईपर्यंत जाणवते. स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वामुळे बीड जिल्ह्यातील राजकारण प्रतिष्ठेचे होऊन बसले आहे. स्व. गोपीनाथराव मुंडेंचा बालेकिल्ला ही ओळख निर्माण झालेल्या बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीनेही आपले पाय चांगलेच रोवले आहेत. नेहमीच मुंडेंना शह देण्याचा प्रयत्न पवार कुटुंबीयांच्या वतीने झाला आहे. गत लोकसभा निवडणुकीमध्ये स्व.गोपीनाथराव मुंडे यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीने आमदार सुरेश धस यांना मैदानामध्ये उतरविले होते. महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ याच बीडमध्ये झाला होता. या निवडणुकीमध्ये स्व. गोपीनाथराव मुंडे यांना मोठा संघर्ष करावा लागला होता. कारण पुतण्या धनंजय मुंडे पहिल्यांदाच या निवडणुकीत स्व. मुंडेंच्या विरोधामध्ये होते. धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांनी स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या विरोधात प्रचाराची राळ उठवली होती. मुंडे एकाकी पडले की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना प्रचाराची धुरा खऱ्या अर्थाने खांद्यावर घेतली ती कन्या पंकजा मुंडे यांनी. पायाला भिंगरी लावून पंकजा मुंडेंनी संपूर्ण बीड जिल्ह्यात प्रचार सभा घेतल्या.

एकीकडे मोदीलाट, स्व. गोपीनाथराव मुंडेंसारखे बहुआयामी नेतृत्व, वंजारा समाजाने मुंडेंच्या पाठीशी उभी केलेली चिरेबंदी भिंत, मुस्लिम-दलित समाजाने दर्शविलेला पाठिंबा या सर्व जमेच्या बाजू असताना स्व. गोपीनाथराव मुंडे यांना गत लोकसभा निवडणुकीमध्ये 1 लाख 44 हजाराने विजय मिळवता आला. केवळ आष्टी मतदार संघात प्राबल्य असलेल्या सुरेश धस यांना 4 लाख 99 हजार मते मिळाली होती. तर स्व.गोपीनाथराव मुंडे यांना 6 लाख 35 हजार मते मिळाली होती. या निवडणुकीत विशेष म्हणजे 39 उमेदवार रिंगणामध्ये आले होते. आणि त्यांनी तब्बल 94 हजार मते घेतली होती. ही मतं स्व. गोपीनाथराव मुंडे यांना न मिळणारी मते होती. 94 हजार मताचे फॅक्शनने स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या विजयाला हातभार लागला. त्यानंतर अवघ्या महिनाभरात मोठी दुर्घटना घडली आणि या दुर्घटनेत बीड जिल्ह्याने स्व. गोपीनाथराव मुंडेंसारखे नेतृत्व गमावले. त्यानंतरच्या झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने स्व. मुंडेंच्या कन्या प्रीतम मुंडे यांना उमेदवारी दिली. मुंडेंना श्रद्धांजली म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी यांनी आपला उमेदवार मैदानात न उतरविण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसचे अशोक पाटील विरूद्ध भाजपाच्या प्रीतम मुंडे यांच्यात सरळ लढत झाली. या लढतीत प्रीतम मुंडे यांनी नवा विक्रम प्रस्थापित केला. साडेसात लाखापेक्षा जास्त मताने विजय मिळवत स्व. मुंडेंच्या नावाला साजेसे काम करून दाखवले. गत निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्यात 18 लाख मतदार होते. या चार वर्षामध्ये मतदारांची संख्या वाढली आहे. 1 लाख 96 हजार नविन मतदारांचा समावेश झाला आहे. 20 लाख 28 हजार मतदार असलेल्या बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा भाजपा विरूद्ध राष्ट्रवादी अशीच लढत पाहण्यास मिळणार आहे.

भाजपाच्या जमेच्या बाजू
होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपासमोर आव्हान असणार आहे ते राष्ट्रवादीचे, मात्र या निवडणुकीत भाजपाच्या काही बाजू जमेच्या आहेत. शिवसेनेशी झालेली युती भाजपाला 1 लाख मत देऊन जाईल. भाजपाचा पारंपारिक मतदार वंजारा, ओबीसी पुन्हा एकदा ताकद देणार, आष्टी मतदार संघात विद्यमान आमदार भीमराव धोंडे आणि आत्ताच पक्षात आलेले आमदार सुरेश धस यामुळे आष्टी विधानसभा मतदारसंघात भाजपाला मोठी ताकद मिळणार आहे.गेवराईत विद्यमान आमदार लक्ष्मणराव पवार, बदामराव पंडित यांची समर्थसाथ, माजलगावात विद्यमान आमदार आर.टी.देशमुख, मोहनराव जगताप, रमेश आडसकर, केज मतदारसंघात विद्यमान आमदार संगिताताई ठोंबरे आणि परळी विधानसभा मतदारसंघातून मिळणारी पारंपारिक ताकद शिवाय बीडचे राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर हे लोकसभा निवडणुकीमध्ये कोणती भूमिका घेतात ते ही महत्वाचे ठरणार आहे.

राष्ट्रवादीची जमेची बाजू
राष्ट्रवादी अमरसिंह पंडित यांच्यासारखा बलाढ्य उमेदवार मैदानात उतरवित असल्याने भाजपाची चिंता वाढणारी आहे. मराठा समाजाचा उमेदवार मैदानात उतरत असल्याने राष्ट्रवादी मोठा फायदा मिळणार आहे. शिवाय ओबीसीचे बडे नेते धनंजय मुंडे हे अमरसिंह पंडितांसाठी ब्रम्हास्त्र ठरणार आहे. मुस्लिम-दलित या समाजाची भाजपाकडे वळालेली मते पुन्हा राष्ट्रवादीकडे वळली जावू शकतात. नाराज असलेला धनगर समाज राष्ट्रवादीला फायदेशीर ठरेल. सर्वात महत्वाचे म्हणजे बीडमध्ये संदीप क्षीरसागर, माजलगावमध्ये प्रकाश सोळंके, केजमध्ये अक्षय मुंदडा, परळीत धनंजय मुंडे, गेवराईत स्वत: अमरसिंह पंडित हे आपआपले गड राखण्यात यशस्वी होणारे सरदार राष्ट्रवादीकडे असल्यामुळे याचा फायदा अमरसिंह पंडितांना होऊ शकतो.