नांदेड- बिअरचे बॉक्स नेणारा ट्रक उलटला, मद्यशौकिनांनी लांबवल्या बाटल्या

14

सामना प्रतिनिधी, नांदेड

नांदेड-वसमतरोडवर गिरजा नदी लगत आज सकाळी संभाजीनगरवरून आंध्रप्रदेशात विदेशी बिअर घेऊन जाणारा ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. रविवारचा दिवस असल्याने अनेक मद्यपी शौकिनांनी आणि तळीरामांनी या संधीचा फायदा घेवून पडलेल्या बिअरच्या बाटल्या अक्षर: लांबवल्या.

आज सकाळी 10 वाजता आंध्रप्रदेशकडे दारू घेवून जाणारा ट्रक क्र. एमएच-21-एक्स-5411 हा संभाजीनगरवरून येत होता. मात्र मालेगाव ते वसमतरोडवर असलेल्या गिरजा नदी लगत ट्रकचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा ट्रक पुलाजवळच उलटला. या ट्रकमध्ये दारू आणि बिअरचे बॉक्स भरलेले होते. रस्त्यावर मोठ्याप्रमाणात या बाटल्या पडल्यानंतर अनेक मद्यपी व तळीरामांची त्याठिकाणी उडी पडली. रविवारचा दिवस असल्याने आज फुकटात दारू प्यायला मिळणार यामुळे अनेकांनी या ठिकाणी लयलुट करून दारू आणि बिअरचे बॉक्स लंपास केले. ट्रकचालकाने नजीकच्या पोलिस स्थानकाची माहिती घेऊन तेथे फोन केला. त्यावेळी पोलीस शिपाई शेख मजाज, किशोर हुंडे, पोलीस मित्र सुनिल एडके आदी त्याठिकाणी पोहंचले आणि त्यांनी त्याठिकाणची सुरक्षा वाढवली.

ट्रकचालकाच्या समोरच त्याला मदत न करता तळीरामांनी या ठिकाणचे अस्तव्यस्त पडलेले दारू आणि बिअरचे बॉक्स पळवले. हताश ट्रकचालक हा सर्वप्रकार हतबल होऊन पाहत होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तेथील सुरक्षा वाढविली. एैन रविवारच्या दिवशी मद्यपी व तळीरामांना फुकटात दारू मिळाली. या ट्रकमध्ये जवळपास 25 ते 30 लक्ष रूपयांचा माल होता असे पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या