धोकादायक झाडांची छाटणी पावसाळय़ाआधी करा; पालिकेचे आवाहन

4

सामना ऑनलाईन । मुंबई

पावसाळ्यात झाडांच्या फांद्या आणि झाडे कोसळून वित्त आणि जीवितहानी होण्याचा धोका असल्यामुळे पावसाळ्याआधी धोकादायक झाडे-फांद्यांची छाटणी करा असे आवाहन पालिकेने केले आहे. या झाडांची माहिती विभाग कार्यालयात देऊन पालिकेच्या पूर्वपरवानगीने हे काम करावे, असेही प्रशासनाने सुचवले आहे.

सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या झाडांची निगा पालिकेद्वारे घेतली जाते तर सोसायटी, शासकीय-निमशासकीय संस्था, खासगी जागा इत्यादींमध्ये असणाऱ्या झाडांची जबाबदारी वापरकर्त्याची असते. दरवर्षी पावसाळ्याच्या काळात झाडे पडून दुर्घटना होत असतात. या पार्श्वभूमीवर विशेष बैठकीत पावसाळापूर्वतयारीच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी दिल्याची माहिती उद्यान अधीक्षक जीतेंद्र परदेशी यांनी दिली.

पालिका क्षेत्रात 2018 मध्ये पूर्ण झालेल्या वृक्ष गणनेनुसार एकूण 29 लाख 75 हजार 283 झाडे आहेत. यापैकी 15 लाख 63 हजार 701 झाडे खासगी आकारांमध्ये आहेत. तर 11 लाख 25 हजार 182 एवढी झाडे शासकीय परिसरांमध्ये आहेत. याव्यतिरिक्त 1 लाख 85 हजार 333 झाडे ही रस्त्यांच्या कडेला असून उर्वरित 1 लाख 1 हजार 67 एवढी झाडे विविध उद्यानांमध्ये आहेत.

अशी आहे प्रक्रिया

झाडांची छाटणी किंवा मृत-धोकादायक झाड कापावयाचे झाल्यास नियमांनुसार विहित शुल्क विभाग कार्यालयाकडे जमा करावे. 7 दिवसांनंतर झाडांच्या छाटणीची प्रक्रिया केली जाईल. तोडलेल्या फांद्या व इतर कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी संबंधितांचीच किंवा नियुक्त केलेल्या ठेकेदाराची असेल.