भिकाऱ्यांची माहिती देणाऱ्यांना मिळणार ५०० रुपयांचं बक्षिस

सामना ऑनलाईन । हैदराबाद

तेलंगाना राज्य आपली ऐतिहासिक राजधानी हैदराबादला भिकारी मुक्त शहर बनवण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी तेथील सरकारनी अनोखी योजना आखली आहे. भिकाऱ्यांची माहिती देणाऱ्यांना आता बक्षिस देण्यात येणार आहे. तेलंगानाच्या जेल विभागानं जाहीर केलं आहे की, शहरातील कोणत्याही रस्त्यावर भिकाऱ्यांची माहिती देणाऱ्यांना ५०० रुपयाचं बक्षिस देण्यात येणार आहे. यासाठीच्या सूचना जेल कंट्रोल रुमवर देता येणार आहे. जेल विभागानं हैदराबादला भिकारी मुक्त शहर बनवण्यासाठी ही मोहीम उघडली आहे.

याआधी नोव्हेंबरमध्ये ग्लोबल इंटरप्रेन्योरशीप संमेलनासाठी संपूर्ण शहर भिकारी मुक्त करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इंवाका ट्रम्प या सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमासाठी शहरातील भिकाऱ्यांना हटवण्यात आलं होतं. जेल विभागानं सुरू केलेल्या मोहिमेद्वारे भिकाऱ्यांना पकडून त्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे, त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना काम करण्याचं ट्रेनिंग देण्यात येणार आहे, अशी माहिती जेल विभागाचे वरिष्ठ अधिकारी व्ही के सिंह यांनी दिली आहे.

जे भिकारी आजारी आहेत त्यांना योग्य उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. जर भिकारी तंदुरुस्त असतील तर त्यांना त्यांच्या योग्य रोजगार दिले जाणार असल्याची माहिती सिंह यांनी दिली आहे. गेल्यावर्षी जेल विभागानं ७४१ पुरुष आणि ३०० महिलांना पकडलं होतं. हैदराबाद पोलिसांनी याआधीच ७ जानेवारी २०१८ पर्यंत रस्त्यावर भीक मागणाऱ्यावर बंदी घातली आहे. भिकाऱ्यांमुळे रस्त्यावरील वाहतूक आणि पादचाऱ्यांना त्रास होतो, अशी माहिती पोलिसांनी दिली.