पडद्यामागची मंडळी

शिबानी जोशी

पडद्यावर दिसणारे कलावंत हे सेलिब्रिटीच असतात, पण या नाटय़प्रवासात पडद्यामागे खपणारे हात खऱया अर्थाने नाटक पेलतात.

एका नाटकाच्या प्रयोगात ४ किंवा ५ कलाकार असतील तर पाठीमागे कमीत कमी १५ ते २० मंडळी मेहनत घेत असतात. तेव्हा तो प्रयोग प्रेक्षकांसमोर उभा राहत असतो. त्यातले नेपथ्यकार, संगीत संयोजक जाहिरात करणारे, निर्माते, दिग्दर्शक, लेखक सर्वांना माहीत असतात. कारण त्यांचं जाहिरातीतून नाव जातं. नाटकाच्या अनाऊन्समेंटच्या वेळी या प्रत्येकांच नाव जातं परंतु याशिवायही बुकिंग क्लार्क, डोअरकीपर, तिकीट तपासनीस, मॅनेजर, अगदी ३ घंटा वाजवणारे, पडदा उघडणारे, इस्त्री करणारे याच्या नावाचा उल्लेखही कोठे होत नाही.

या पाठीमागच्या मंडळींत मुख्यतः येतात बुकिंगवाले. प्रत्येक निर्माता तिकिटाची विक्री करण्यासाठी एकाला कॉन्ट्रक्ट देतो. एक प्रयोग लागला असेल तर त्याआधी चार दिवस तिकीट बुकिंगला सुरुवात होते. मग त्या दिवसांप्रमाणे निर्माता त्यांना पैसे देतो. आज शिवाजी मंदिरसारख्या ठिकाणी हरी पाटणकर, मनोज तोंडवलकर, विद्या बाणकरसारखे अनेक वर्षांचे कॉन्ट्रक्टर घेणारी ज्येष्ठ मंडळी आहेत. ज्येष्ठांमध्ये भालचंद्र नाईक, दिलीप जाधव, दिनू पेडणेकर यांचीही नावं घेता येतील. त्यांच्याकडे ७-८ निर्मात्यांची कामं असतात. त्याशिवाय गाण्याचे कार्यक्रम, पुस्तक प्रकाशन अशा कार्यक्रमांच्या तिकिटांची विक्रीसुद्धा हे करून देतात.

आज तिकीट बुकिंगकरिता त्यांना नाटय़क्षेत्राची इतकी माहिती मिळालेय की यांच्यातले ज्येष्ठ लोक स्वतःसुद्धा निर्माते बनून काही शोज् करत आहेत. तिकिटाची बारी झाली की येतात डोअरकीपर किंवा तिकीट तपासनीस. यांचंसुद्धा कॉन्ट्रक्ट बेसिसवरच काम चालतं. त्यांनाही निर्माता पैसे देतो. नाटकाच्या आधी १५ मिनिटं आणि नाटक संपेपर्यंत चालत येणाऱया प्रेक्षकांचं तिकीट तपासून त्यांना त्यांच्या सीटपर्यंत नेण्याचं डोअरकीपचं काम ते करतात. याशिवाय कॅण्टीन चालवणारेही कॉन्ट्रक्टवरच असतात, त्यांना त्या त्या थिएटरनी कॉन्ट्रक्ट दिलेलं असत. शिवाजी मंदिरसारख्या ठिकाणी आज वर्षानुवर्षे ही काम करणारी मंडळी आहेत. कॉन्ट्रक्टर बदलला तरी त्यांची काम करणारी मंडळी नाटकाच्या वेडापायी तिथेच काम करणं पसंत करतात. नाटक सुरू होताना तीन बेल होतात व पडदा उघडतो. आपल्याला ते रुटीनच वाटतं. पण ते काम महत्त्वाचं नाही का? घंटा देणारे व पडदा उघडणारेही कॉन्ट्रक्टवर बऱयाचशा थिएटरमध्ये घेतले जातात. शिवाजी मंदिरचा कॅण्टीनवाला बाळू वासकर, शांताराम महाडिक प्रेक्षकांना चांगलेच परिचयाचे आहेत. त्यांच्या हातचा बटाटेवडा लोकांना तितकाच आवडतो कारण त्याची चव चिरपरिचित आहे. कलाकारांच्या कपडय़ांना इस्त्री करणारे, रंगभूषाकार ही निर्मात्यांची ठरवलेली माणसं असतात. परंतु बुकिंगवाले, डोअरकीपर, पडदा उघडणारे, कॅण्टीनवाले हे प्रत्येक थिएटरमध्ये कॉन्ट्रक्टवर उपलब्ध असतात.

नाटकाच्या प्रेमापायी ही मंडळी काम करतात. पण यांना मिळणारी बिदागी फारच थोडी असते. डोअरकीपरचे एका प्रयोगाचे कॉन्ट्रक्टर असेल तर निर्माता साधारण ८०० रुपये देतात. पडदा व साऊंड सिस्टमवाल्याला साधारण २९० रुपये तर ४ दिवस बुकिंगला बसलं तर अंदाजे ८०० रुपये प्रत्येक प्रयोगाला मिळतात. ही रक्कम फारच तुटपुंजी असते. परंतु असे २-३ शोज एका दिवशी असू शकतात. शनिवार-रविवारी बरेच शोज असतात. तसंच बुकिंगही चांगली असते त्यामुळे सरासरी बरी रक्कम सुटून जाते.

बॅकस्टेज कलाकारांची तरी युनियन आहे, कलाकारांची संघटना आहे, निर्माता संघ आहे. मात्र या रंगयात्रींची कोणतीही संघटना नाही, त्यांना पेन्शन नाही, तरीही नेहमीच्या उत्साहात प्रत्येक प्रयोगाला ही मंडळी काम करताना दिसतात. त्यामुळे नाटय़पथावर चालणारे हे खरे यात्रेकरूच म्हटले पाहिजेत. नाटय़पंढरीचे हे सच्चे वारकरीच म्हटले पाहिजेत.